शेकडो हिंदूंच्या हत्यांसह मंदिरांचा विध्वंस घडवणाऱ्या बांगलादेशसोबतचे सर्व क्रिकेट सामने तत्काळ रद्द करा
हिंदु जनजागृती समितीची मागणी
रत्नागिरी, १३ सप्टेंबर – आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या गृहकलहात केवळ हिंदु युवक, युवती, महिला, हिंदूंचे धर्मग्रंथ, हिंदूंची मंदिरे यांनाच लक्ष करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या असून अनेक मंदिरांचा विध्वंस करण्यात आला आहे. हिंदु युवती आणि महिलांवर बलात्कार करण्यात आले. या घृणास्पद आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बांगलादेशाबरोबरचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रद्द करा, अशी मागणी आज रत्नागिरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री, केंद्रीय परराष्ट्रमंत्री, भारत सरकार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या नावे देण्यात आले आहे.
यावेळी सर्वस्वी अरविंद बारस्कर, अजिंक्य केसरकर, अमितराज खटावकर, चंपालाल माळी, मुकेश माळी, ज्ञानेश्वर राऊत, देवेंद्र झापडेकर, छगनलाल छीपा, शशिकांत जाधव, तन्मय जाधव, विष्णू बगाडे, संजय जोशी आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशासोबत भारताचे क्रिकेटचे २ कसोटी सामने या वर्षी १९ सप्टेंबरला चेन्नई येथे, तर २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये होणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांतून समोर आली आहे. बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केले जात असताना देशात क्रिकेट खेळणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, असा हा प्रकार आहे. तेथील शेकडो हिंदूंच्या चिता अद्याप शांत झालेल्या नसतांना अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे.
नुकतेच बांगलादेशमध्ये उत्सव मंडल या तरुण हिंदु युवकाचे कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली धर्मांध जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून दोन्ही डोळे काढून चिरडले.
बांगलादेशाच्या गृह मंत्रालयाने ‘काही दिवसांनी चालू होणाऱ्या श्री दुर्गापूजा उत्सवाच्या कालावधीत मशिदीत होणारी अजान आणि नमाज यांच्या ५ मिनिटे आधी श्री दुर्गादेवीची पूजा आणि ध्वनीक्षेपक प्रणाली बंद करावी’, असा फतावाच काढला आहे. एकूणच बांगलादेशातील न्याययंत्रणाही ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी मुसलमान संघटनेच्या हाती असल्याने हिंदूंना कोणताच आधार नाही.
हिंदू अमेरिकन फाऊंडेशनच्या अहवालानुसार आतापर्यंत धार्मिक छळामुळे १ कोटी १० लाखांहून अधिक हिंदूंनी बांगलादेशातून पलायन केले असून १० लाख हिंदू गायब झाल्याचे उघड झाले आहे. या वर्षी बांगलादेशातील ६४ पैकी ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदूविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून तेथील हिंदू समुदाय असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत आहे.
या निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत –
१.जोपर्यंत बांगलादेशातील हिंदू हे पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत बांगलादेशासोबत भारत यांच्यातील सर्व क्रिकेटचे सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यात यावेत.
२.एखाद्या देशात मुस्लिम समुदायावर वा इस्लाम पंथावर आघात झाल्यावर सर्व मुसलमान देश एकत्र येऊन त्याचा तीव्र निषेध करतात. इतकेच नव्हे, तर त्याविरोधात जागतिक स्तरावर आवाज उठवतात, आपल्या धर्मबांधवांचे हित जपतात. अगदी तशीच कणखर भूमिका भारताने हिंदूंबाबत घेणे अत्यंत आवश्यक आहे.
३.बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील बांगलादेश सरकारला सक्त सूचना द्याव्यात.
४.बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी. तेथील हिंदूंना तातडीने हानीभरपाई देण्यासाठी बांगलादेश सरकारकडे तत्काळ मागणी करावी.
५.तसेच यापूर्वी भारतात घुसलेल्या जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोरांना देशाच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे तात्काळ भारताच्या बाहेर काढण्यात यावे, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.