https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

किशोर गटात उत्तर प्रदेश तर किशोरी गटात आंध्रप्रदेशवर महाराष्ट्राची मात

0 54
  • राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा
  • महाराष्ट्राची उप उपांत्य फेरीत प्रवेश; यजमान कर्नाटकचीही विजयी वाटचाल

टिपटूर (कर्नाटक) : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा कल्पतरू क्रीडांगण टीपटूर, जिल्हा टुमकूर (कर्नाटक) येथे सुरु आहे. या स्पर्धेत उप उपांत्य पूर्व फेरीत किशोर गटात महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशचा तर किशोरी गटात आंध्र प्रदेशचा पराभव करत उप उपांत्य फेरी गाठली.

कल्पतरू क्रीडांगण टीपटूर येथे सुरु असलेल्या स्पर्धेत किशोर गटात महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशचा 28-26 असा 2 गुण आणि 6 मिनिट राखून विजय मिळवला. महाराष्ट्र संघातर्फे ओमकार सावंत (1.30 मि. संरक्षण व 2 गुण), भीमसिंग वसावे (3.20 मि. संरक्षण ), विनायक भांगे (6 गुण ), समर्थ पंधेरे (1 मि. संरक्षण व 6 गुण) यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची भूमिका बजावली. पराभूत उत्तरप्रदेशतर्फे करन गिरी (1.50 मि. संरक्षण व 2 गुण ), दीपक (14 गुण) यांनी चांगला खेळ केला.

किशोरी गटात महाराष्ट्र संघाने आंध्र प्रदेशचा एक डाव 26-10 असा 16 गुणांनी पराभव केला. मैथिली पवार (3 मि., 1.20 मि. संरक्षण व 8 गुण ), मुग्धा विर (2.30 मि., नाबाद 1.30 मि. संरक्षण व 2 गुण ), स्नेहा लोमकाणे (1.30 मि. संरक्षण व 8 गुण ), अक्षरा डोळे (2.40 मि. संरक्षण व 2 गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ करत एकतर्फी विजयाचा मार्ग सुकर केला. पराभूत आंध्रप्रदेश तर्फे डी. रेणू (1.40 मि. सरंक्षण), आर. सरस्वती (1 मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला.

किशोर गटाच्या उर्वरित सामन्यात तेलंगणाने छत्तीसगड चा 2 गुण आणि 2 मिनिट 10 सेंकद राखून (30-28) विजय मिळवला. गुजरात ने आंध्रप्रदेशचा 6 गुणांनी (36-30) असा पराभव केला. कर्नाटकने कोल्हापूरचा 16 गुणांनी (38-22) असा तर दिल्ली ने विदर्भचा एक डाव 4 गुणांनी (22-18) असा पराभव करत उप उपांत्य फेरीत प्रवेश केला.

किशोरी गटाच्या उर्वरित सामन्यात छत्तीसगडने गुजरातचा 2 गुण आणि 6.5 मिनिटे (18-16) राखून तर राजस्थान संघाने झारखंडचा एक डाव 10 गुणांनी ( 24-14) असा पराभव केला. यजमान कर्नाटक संघाने तेलंगणावर एक डाव आणि 2 गुण राखून मात केली. पंजाब ने हरियाणाचा एक डाव 2 गुणांनी (16-14) तर विदर्भ ने पॉंडेचरीचा (14-12) 2 गुण आणि 6.30 मिनिटे राखून पराभव केला. कोल्हापूर संघाने पश्चिम बंगालचा एक डाव 2 गुणांनी पराभव करत पुढील फेरी गाठली.

Leave A Reply

Your email address will not be published.