https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

इंडिया बूक ऑफ रेकॉर्डने घेतली जे. डी. पराडकर यांच्या लेखनाची दखल

0 170
  • कोकण या एकाच विषयावर सलग आठ पुस्तकं
  • पुणे येथील चपराक प्रकाशनची निर्मिती

संगमेश्वर दि. २७ : एक लेखक , एक विषय आणि एकच प्रकाशक मिळून सलग आठ पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या पुणे येथील चपराक प्रकाशन आणि संपादक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केलेल्या कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या लेखन विक्रमाची ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ’ मध्ये नोंद झाली आहे. या लेखन विक्रमाबद्दल चपराक प्रकाशन, संपादक घनश्याम पाटील आणि लेखक जे. डी. पराडकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

जे. डी. पराडकर हे गेली ३२ वर्षे विविध विषयांवर लेखन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकणचे पर्यावरण, पर्यटन, गड किल्ले , ऐतिहासिक स्थळे, पुरातन मंदिरे, व्यक्तिमत्वे यांचा समावेश आहे. आजवर त्यांचे एक हजार पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. कोकणवर सातत्याने लेखन करणाऱ्या पराडकर यांच्या लेखनाची दखल प्रथम ‘ कालनिर्णय ’ चे संचालक जयेंद्र साळगांवकर यांनी घेतली. पुस्तक रूपाने हे लेखन सर्व वाचकांसमोर यावे, या उद्देशाने साळगांवकर यांनी पुणे येथील चपराक प्रकाशनचे संपादक त्यांचे मित्र घनश्याम पाटील यांच्याकडे पराडकर यांच्या लेखनाची शिफारस केली. जे. डी. पराडकर यांनी चपराक प्रकाशन मध्ये जावून संपादक घनश्याम पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी पाटील यांनी , कोकण वरील आपले सर्व लेखन आवडल्याचे नमूद केले. आपले एकच काय, तर कोकण वरील अनेक पुस्तके प्रकाशित करण्याचे आश्वासन घनश्याम पाटील यांनी या भेटी प्रसंगी दिले होते.

इंडिया बूक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र, मेडल, चपराक प्रकाशित कोकणवरील आठ पुस्तकांसह लेखक जे. डी. पराडकर ( छाया : मिनार झगडे, संगमेश्वर )

चपराक प्रकाशनने अल्पावधीतच जे. डी. पराडकर लिखित कोकण वरील ‘ साद निसर्गाची ’ हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर कसबा डायरी, असं जगावं कधीतरी, बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा, अक्षर यात्रा , प्राजक्ताचे सडे , हळवा कोपरा आणि वेध अंतर्मनाचा अशी एकापाठोपाठ एक पुस्तके प्रकाशित करून पराडकर यांची कोकण या एकाच विषयावरील एकूण आठ पुस्तके प्रकाशित केली. या पुस्तकांची कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगांवकर, चपराकचे संपादक घनश्याम पाटील, ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले, अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य, कवी आणि समुपदेशक प्रसाद कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अभिनेते सतीश सलागरे, गायिका आणि निवेदिका दीप्ती गद्रे, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनी या सर्व पुस्तकांची पाठराखण केली असून स्वतः घनश्याम पाटील, शिक्षण तज्ञ, लेखक संदीप वाकचौरे, साताऱ्याचे शिक्षणाधिकारी, लेखक रवींद्र खंदारे, प्रसिद्ध लेखक समीर बापू गायकवाड, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी, अरुण कमळापूरकर , आकार डी जी नाईन या यूट्यूब चॅनलचे संचालक प्रभाकर सूर्यवंशी अशा दिग्गज मंडळींनी या पुस्तकांच्या प्रस्तावना लिहील्या आहेत.

एका वर्षात सलग ०१ हजार १९२ पाने लिहिण्याचा विक्रम लेखक जे. डी. पराडकर यांनी केला. एकाच लेखकाची, कोकण या एकाच विषयावर सलग आठ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम चपराक प्रकाशन पुणे , संपादक घनश्याम पाटील यांनी केला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सर्व पुस्तकांचे आयएसबीएन नंबर तपासले, पुस्तकांच्या हार्ड कॉपी आपल्याकडे मागवून घेतल्या. विक्रीसाठी ऑनलाइन उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या लिंक तपासल्या , पुस्तकांची मुखपृष्ठ पहिली , पुस्तकांच्या पीडीएफ फाईल तसेच प्रथम श्रेणी दर्जाच्या अधिकाऱ्याचे सर्व लेखन जे. डी. पराडकर यांनीच केले असल्याचे शिफारस पत्र , आदींची गत दोन महिने विविध प्रकारे तपासणी केली. या सर्व प्रकारच्या तपासणीनंतर चपराक प्रकाशन आणि लेखक जे. डी. पराडकर यांच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद केली. याबाबतचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, ओळखपत्र, मेडल आदि जे. डी. पराडकर यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. या विक्रमाबद्दल चपराक प्रकाशन, संपादक घनश्याम पाटील, लेखक जे. डी. पराडकर यांचे विविध मान्यवर लेखक, सामाजिक संस्था, मान्यवर मंडळी आदींनी अभिनंदन केले आहे.

कोकणवरील लेखन मनाला भावले

कालनिर्णयचे संचालक जयेंद्र सागावकर यांनी लेखक जे.डी. पराडकर यांना आपल्याकडे पाठवले. त्यांनी केलेले कोकण वरील विविध विषयांवरचे लेखन आपल्या मनाला भावले म्हणूनच एकापाठोपाठ एक अशी त्यांची आठ पुस्तके चपराक प्रकाशनने प्रकाशित केली आहेत . भविष्यातही चपराक त्यांची आणखी पुस्तके प्रकाशित करणार आहे.

घन:श्याम पाटील, संपादक, चपराक प्रकाशन, पुणे.

या विक्रमाचे हक्कदार आपले मार्गदर्शक !

लेखन प्रवास सुरू करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. वेगळ्या पद्धतीच्या लेखनाला सुरुवात केल्यानंतर वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगांवकर यांनी चपराक प्रकाशनकडे माझ्या लेखनाची शिफारस केली. चपराक प्रकाशन, संपादक घनश्याम पाटील आणि ज्योती पाटील यांनी एका वेगळ्या ध्येयाने प्रेरित होत माझ्या लेखनाला न्याय दिला. विविध मान्यवरांनी पुस्तकाची पाठराखण करत प्रस्तावना दिल्या. चित्रकार विष्णू परीट , हेमंत सावंत यांनी पुस्तकांची अप्रतिम अशी मुखपृष्ठे केली. त्यामुळे या विक्रमाचे हक्कदार हे सर्व मान्यवर आहेत.

जे. डी. पराडकर , लेखक संगमेश्वर.

Leave A Reply

Your email address will not be published.