उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी व लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी नाईक, स्वप्नाली पाटील यांनी केली असून या विरोधात कोकण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात आधी कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण,मुख्य कार्य कारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद,नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर आदि ठिकाणी पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती.
शासनाच्या सर्व विभागात पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. कळंबूसरे ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात कसा भ्रष्टाचार झाला आहे हे पुराव्यानिशी शासनाच्या निदर्शनास आणून दिले तरी सुद्धा सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही. त्यामुळे मी व इतर ग्रामपंचायत सदस्य आम्ही कोकण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलो आहोत. शासनाकडून आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
नितीन केणी, ग्रामपंचायत सदस्य, कळंबूसरे.
शांततेच्या व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसत नसल्याने तसेच संबधित भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने कळंबुसरे ग्रामपंचायतचे सदस्य नितीन पांडुरंग केणी, सविता मनोहर नाईक, अश्विनी तळीराम नाईक, स्वप्नाली महेश पाटील हे सोमवार दि. ३० ऑक्टोंबर २०२३ पासून कोकण आयुक्त कार्यालय, कोकण भवन बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.आज दि. ३०/१०/२०२३ रोजी बेमुदत आंदोलनाचा पहिला दिवस होता.