महायुती सरकारला बहीण नाही तर सत्ता लाडकी: बाळासाहेब थोरात.
महायुती सरकारने ५ लाख कोटींचे कर्ज घेऊन टेंडर काढले व ३० टक्के कमीशन खाल्ले: विजय वडेट्टीवार
बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक तयारी आढावा बैठका संपन्न
बुलढाणा/मुंबई, दि. १३ ऑगस्ट २०२४
देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत पण महाभ्रष्ट महायुती सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, शेतमालाला एमएसपी नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. महागाई व बेरोजगारी नियंत्रणाचा कार्यक्रम या सरकारकडे नाही. लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपा युतीला धडा शिकवला आहे आता विधासभा निवडणुकीत महाविकास आघाडी २/३ बहुमताने विजयी होऊन सरकार बनवेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह विदर्भ दौ-यावर असून ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आज बुलढाणा येथे बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, वाशीम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अमित झनक, अकोला काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर अकोला शहर काँग्रेसचे अध्य डॉ. प्रशांत वानखेडे, आमदार राजेश एकडे, आ. धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, संजय राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.