मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पावसाळ्यात ३ तर बिगर पावसाळी हंगामात ६ दिवस धावणार!
उद्यापासून आरक्षण खुले होणार
रत्नागिरी : ओडिशामधील भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर मडगाव येथे दि 3 जून रोजी होणारे उद्घाटन रद्द झालेल्या मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्ससिंगद्वारे सकाळी १० वा. ३० मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार तीन दिवस तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातील शुक्रवार वगळून सहा दिवस धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे अधिकृत नोटिफिकेशन जारी झाले आहे. वंदे भारतच्या कमर्शियल फेऱ्यांसाठी बुकिंग ऑनलाईन तसेच संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर दि. 26 जूनपासून सुरू होणार आहे.
मडगाव येथे ३ जून रोजी कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार होते. मात्र, ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात घडल्यानंतर त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले होते. देशभरात विविध मार्गांवर धावणाऱ्या पाच वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात मडगाव ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. पावसाळ्याच्या कालावधीसाठी कोकण रेल्वे मार्गावर स्वतंत्र पावसाळी वेळापत्रक आखले जाते. त्यानुसार या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेगांवर मर्यादा येते. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील तीन दिवस धावणार आहे. पावसाळी वेळापत्रक संपल्यानंतर मात्र ही गाडी शुक्रवार वगळून आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस या स्थानकांवर थांबणार
कोकण रेल्वे मार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली तसेच थिवी स्थानकावर थांबे घेणार आहे.
दरम्यान, मागील कित्येक दिवस उद्घाटन रद्द झालेली वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर नेमकी कधी धावणारी याकडे कोकणवासियांचे लक्ष लागले होते. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे. मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव येथे शुभारंभ झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसचे कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड आदी ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. कोकण रेल्वेकडून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.