मांडवी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
- दुर्घटनेमुळे साखळी ओढून नागोठणे स्थानकात थांबवली रेल्वे
मुंबई : मडगाव- मुंबई मांडवी एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी सायंकाळी एका प्रवाशाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रवाशाला मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात येत होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार मडगाव ते मुंबई (10104) या मांडवी एक्सप्रेसमधून ‘एस ७’ या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा धक्का बसल्याने गाडी आपत्कालीन साखळी ओढून नागोठणे स्थानकात उभी करण्यात आली. प्रवाशाला धावत्या गाडीत हृदयविकाराचा धक्का बसल्याने मांडवी एक्सप्रेस शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत नागोठणे स्थानकात उभी ठेवण्यात आली होती. नागोठणे स्थानकावर रुग्णवाहिका आल्यानंतर त्यातून या प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते. हृदयविकाराच्या धक्क्याने या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविकांत तेली (गोरेगाव, मुंबई ) असे या प्रवाशाचे नाव आहे.
ही घटना मध्य रेल्वेच्या अखत्यारित घडली. या घटनेदरम्यान ‘चेन पुलिंग’ झाल्याने रेल्वे पोलिसांकडून या घटनेबाबत तपास सुरू असल्याचे समजते.