पनवेल येथे पार पडला सोहळा
उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : पत्रकार उत्कर्ष समिती वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार 2023 सोहळा आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे रविवार दिनांक 11 जून /2023 रोजी पार पडला. यावेळी उरणच्या पूनम पाटेकर यांचा सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.
सुप्रसिद्ध गायक आणि बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पूनम पाटेकर यांना सन्मानित केले गेले. पूनम पाटेकर या शाळा, अनेक छोटी मोठी गावे,महिला व मुलीसाठी आरोग्य विषयक कार्यक्रमात मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्स विषयी जनजागृती करतात तसेच महिलांना व्यवसाय देखील उपलब्ध करून देतात. गेली तीन वर्षे त्या हे कार्य त्या सातत्याने करत आहेत.त्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सोहळ्यात पूनम यांना सन्मानित करण्यासाठी ज्यांनी पूनम पाटेकर यांच्या कामाची दखल घेतली ते पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांचे पूनम यांनी आभार मानले.तसेच पूनम यांच्या कामाची वेळोवेळी दखल घेणारे व त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावणारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचे देखील त्यांनी आभार मानले आहे.