उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : ७ एप्रिल रोजी सारडे, ता. उरण येथे सारडे ग्रामस्थांची गावठाणविस्तारा बाबत एक मोठी सभा पार पडली. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गावठाण विस्तार तज्ञ राजाराम पाटील, गावठाण विस्तार तज्ञ किरण पाटील,अतुल लोंढे हे उपस्थित होते. अतुल लोंढे यांनी करंजाडे गावचा गावठाण विस्तार करताना आलेला अनुभव कथन केला. किरण पाटील यांनी गावठाण विस्तार करताना कोणत्या कायद्याचा लाभ होतो व ही कायदेशीर लढाई करताना कोणती पद्धत अवलंबावी लागते.लोकसहभागाची आवश्यकता तसेच सरकारी यंत्रणा ग्रामस्थांची कशी फसवणूक करते हे सर्व विषद केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राजाराम पाटील म्हणाले की गावठाणविस्तार हा आपला मूलभूत अधिकार असून, आपल्या नैसर्गिक वाढीपोटी बांधलेली घरे ही आमच्या मालकी हक्कांच्या जागेत असून ती अधिकृत करण्यासाठी तसेच आपले गाव सुरक्षित करण्यासाठी गावठाणविस्तार करणे जरुरी आहे. एमआयडीसी ने इथल्या जमिनी नोटिफाईड केल्या आहेत,शेतकऱ्यांनी हरकती घेऊन सुद्धा एमआयडीसीने सातबाऱ्या वर शिक्का मारला असून शेतकऱ्यांना मोबदला किती मिळेल,इथे कोणती इंडस्ट्री येईल ह्याची कोणतीही माहिती शासनाने दिली नाही. सारडे गावाच्या शेतकऱ्यांनी एमआयडीसी विरोधात हरकती नोंदविल्या असून जमीन देण्यास कडाडून विरोध केला आहे.
राजाराम पाटील पुढे म्हणाले की इथले शेतकरी आपल्या जमिनी विकसित करण्यासाठी सक्षम असून ,गेल्या ७० वर्षांत न झालेला गावठाणविस्तार “सारडे ग्रामविकास कमिटीच्या “मार्फत लोकसहभाग व लोकवर्गणीतून सारडे ग्रामस्थ करणार आहेत.तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल. व ह्या साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन राजाराम पाटील यांनी दिले.आपल्या प्रास्ताविक मधून मनोज पाटील यांनी सारडे गावाची गावठाणविस्ताराची आवश्यकता कशी आहे हे सांगितले.
सभे मध्ये सर्व ग्रामस्थांच्या अनुमतीने गावठाणविस्तारा साठी “सारडे ग्रामविकास कमिटीची” एकमुखाने स्थापना करण्यात आली.ह्या वेळी कमेटीला सारडे महिलांच्या वतिने रुपाली संदीप पाटील यांनी अनुमोदन दिले तर सारडे ग्रामस्थांच्या वतीने भार्गव म्हात्रे,विद्याधर पाटील,महेश पाटील यांनी अनुमोदन दिले. सुरवातीला सरपंच रोशन पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर स्वप्निल पाटील यांनी आभार मानले.सुशांत माळी यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
या सभेसाठी सारडे गावांतील सर्व तरुण मंडळी मोठया प्रमाणावर उपस्थित होते तसेच तरुणांनी ह्या सभेच्या जनजागृती साठी मोठी मेहनत घेतली होती. त्याचप्रमाणे गावांतील स्त्रीवर्ग व ग्रामस्थ अतिशय मोठ्या संख्येने ह्या सभेला हजर होते.