रत्नागिरी : दिवा ते रत्नागिरी मार्गावर या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच सुरू करण्यात आलेल्या गणपती स्पेशल मेमू गाडीला आरवली ते संगमेश्वर दरम्यान कडवई स्थानकावर देखील अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 16 सप्टेंबरपासून होणार आहे.
या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी दिवा ते रत्नागिरी (01153/01154) ही मेमू स्पेशल गाडी दिनांक 13 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. या गाडीला कडवई येथे थांबा देण्याची मागणी कडवई परिसरातील जनतेने केली होती. या मागणीची दखल घेत कोकण रेल्वेने या गाडीला कडवई येथे अतिरिक्त थांबा दिला आहे. या संदर्भात रेल्वेने माहितीनुसार दिवा रत्नागिरी मार्गावर धावताना मेमू स्पेशल गाडी दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनी कडवई येथे येईल तर रत्नागिरी ते दिवा मार्गावर धावताना सायंकाळी 4 वाजून 33 मिनिटांनी ही गाडी कडवई स्थानकावर दाखल होऊन एक मिनिटाचा थांबा घेऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.