युनायटेड गुरुकुल विभागाने केलेले पोवाडा सादरीकरण ठरले सर्वोत्कृष्ट!
संगमेश्वर दि. ६ : बालरंग भूमी परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून जवळपास १०० संघांनी सहभाग नोंदवला होता दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागातील गीत मंचात सहभागी मुला-मुलींनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या धाटणीने केलेले पोवाड्याचे सादरीकरण कौतुकास पात्र ठरले .लोककला समूह गायन या प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचे म्हणजे सर्वोत्कृष्ट पारितोषिक या सांघिक सादरीकरणाला मिळाले ! प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व रुपये ११०००/- अशा स्वरूपाचे हे पारितोषिक विद्यार्थ्यांनी मिळवले.
गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने संगीत विषयाचे मार्गदर्शन नियमितपणे करण्यात येते त्यामुळे लोककलेचे हे सादरीकरण विद्यार्थी उत्तम प्रकारे करू शकले. गाणाऱ्या मुलांच्या साथीला असणारी शालेय वयोगटाचीच गुरुकुलातीलच वाद्य साथ देणारी मुले हेही या सादरीकरणाचे वैशिष्ट्य! त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात प्रकाशित झालेल्या ‘मराठ्यांची संग्राम गीते ‘ नावाच्या एका दुर्मिळ पुस्तकातील बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरती आधारित हा पोवाडा गुरुकुलामध्येच चाल लावून संगीतबद्ध झाला.
पोवाड्याची चाल व संगीत संयोजन गुरुकुलातील अध्यापक पराग लघाटे यांनी केले. मुलांना या प्रक्रियेतून, सरावाच्या सत्रांमधून चाल लावणे,संगीत संयोजन करणे असे अनुभवही घेता आले. जे गुरुकुल प्रक्रियेमध्ये सगळ्याच विषयांच्या बाबतीत नियमितपणे दिले जातात. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासासोबतच अनुभवातून शिक्षण द्यायचा गुरुकुल मध्ये नेहमी प्रयत्न होतो.
या सादरीकरणासाठी मुलांना संगीत शिक्षक वरद केळकर आणि प्रथमेश देवधर यांनी मार्गदर्शन केले.