रत्नागिरी : शहरात सुरू असलेले मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच माघी गणेशोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे वळवलेली वाहतूक यामुळे शुक्रवारी वाहतूक कोंडीचा वाहनधारक तसेच नागरिकांना सामना करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून शहरात आठवडा बाजारापासून माळनाक्याच्या दिशेने मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू असलेल्या माळनाका भागात दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गिकेवरून वळवण्यात आल्यामुळे मागील काही दिवस सकाळ तसेच संध्याकाळी कार्यालय तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे. अशातच शुक्रवारी सायंकाळी माघी गणेशोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे माळनाक्यापासून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.