रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस नियमितपणे धावू लागली आहे. ही गाडी बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून सहा दिवस तर सध्या सुरू असलेल्या पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातील तीनच दिवस धावणार आहे. असे असले तरी कोकण रेल्वेच्या मार्गावर मात्र ती आठवड्यातील सहा दिवस दिसणार आहे. इतकेच नव्हे तर पावसाळ्यात देखील ती तिच्या थांब्यांवर देखील आठवड्यातील सहा दिवस येणार आहे. तुम्ही म्हणाल काय आहे हा नेमका प्रकार? आठवड्यातून तीनच दिवस धावणार आणि सहा दिवस दिसणार, हे कसं शक्य आहे? होय, पण असंच आहे आणि ते तुम्हालाही ठाऊक आहे.
गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आणि सहा दिवस ती कोकण रेल्वे मार्गावर आणि तिच्या थांब्यांवर दिसणार याचं कारण काय आहे हे समजून घेऊ.
दिनांक 27 जून रोजी गोव्यात शुभारंभ झालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या दिनांक 28 जून 2023 पासून सुरू झाल्या आहेत. ही हाय स्पीड ट्रेन नॉन मॉन्सून वेळापत्रकानुसार ( दिनांक १ नोव्हेंबर ते ९ जून ) आठवड्यातील शुक्रवार वगळून सहा दिवस धावणार आहे तर सध्या सुरू असलेल्या पावसाळी वेळापत्रकानुसार ( दिनांक 10 जून 31 ऑक्टोबर ) वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. म्हणजे मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर (22229) ही गाडी सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावणार आहे तर मडगाव ते सीएसएमटी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस (22230) मंगळवार गुरुवार तसेच शनिवारी धावणार आहे. म्हणजेच आठवड्यातील कोणत्याही एकाच दिशेने ती तीनदा धावणार असली तरी अप व डाऊन या दोन्ही दिशांचा विचार करता ही गाडी तिच्या मार्गावर आणि तिच्या थांब्यांवर सहाही दिवस प्रवास करताना दिसणार आहे.
नॉन मॉन्सून वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार म्हणजेच अप व डाऊन या दोन्ही दिशांचा विचार करता ती तिच्या मार्गावरून येताना व जाताना असा मिळून आठवड्यातून बारावेळा प्रवास करणार करणार आहे.
हेही अवश्य वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!
तर आता तुमच्याही लक्षात आलं असेल की, आठवड्यातून तीनच दिवस धाऊनही वंदे भारत एक्सप्रेस सहा दिवस तुम्हाला कोकण रेल्वे मार्गावर कशी पाहायला मिळणार आहे ते!