”खल्वायन” ची मासिक संगीत सभा अनयच्या हार्मोनियम सोलो वादनाने व ऋतुजाच्या गायनाने रंगली
:रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची २७८ वी मासिक संगीत सभा शनिवार दि. ११ जून
२०२२ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळात नेहमीप्रमाणेच सौ.गोदुताई जांभेकर विद्यालय, एस टी स्टँड
समोर, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. कै.डॉ. आशुतोष मुळ्ये स्मृती मासिक संगीत
सभा म्हणून साजर्या झालेल्या या मैफलीमध्ये गोव्याचा युवा कलाकार श्री. अनय देवीदास
घाटे ह्याच्या हार्मोनियम सोलोवादनाने तर दापोलीची उदयोन्मुख युवा गायिका कु. ऋतुजा
संतोष ओक हिच्या शास्त्रीय तसेच अभंग – नाट्यगीत गायनाने सदरहू संगीत सभा रंगतदार
झाली.
मैफलीचे सुरवातीला डॉ. अदिति मुळ्ये यांचे हस्ते नटराज पूजन, दीप प्रज्वलन होऊन श्रीफळ
वाढविले गेले. प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक करून कलाकारांची ओळख करून दिली. संस्था
अध्यक्ष मनोहर जोशी यांचे हस्ते कलाकारांना सन्मानपत्र, श्रीफळ, व गुलाब पुष्प देवून
सन्मानित करण्यात आले. मैफलीची सुरवात अनय घाटे यांच्या हार्मोनियम सोलो वादनाने
झाली. सुरवातीला त्यांनी राग शाम कल्याण मधील विलंबित एकतालात बद्ध असलेली
बंदिश सादर केली. यामध्ये आलाप, जोड, झाला सादर झाल्यावर त्यानंतर त्यांनी द्रुत तीन
तालातील बंदिश सादर केली. त्यानंतर त्यांनी नारायणा रमा रमणा हे नाट्यगीत सादर केले.
हार्मोनियम वादनातील त्यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. विलंबित तसेच द्रुत वादनातील
त्यांचे वादन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले. यांना तबल्याची उठावदार तसेच समर्पक
साथसंगत गोव्याच्या रुद्राक्ष वझे यांनी तेवढ्याच तयारीने केली.
मैफलीचा उत्तरार्ध दापोलीची युवा गायिका कु. ऋतुजा संतोष ओक हिच्या दमदार गायनाने
झाला. सुरवातीला राग मियामल्हार मधील “करीम नाम” हा बडा ख्याल तिने सादर केला .
त्यानंतर सावन घन गरजे, नमुनी ईष चरणा, तुम्हा तो शंकर सुखकर हो, मम सुखाची ठेव
देवा, नाथ हा माझा, काहेरी ननदिया (ठुमरी), धन राशी जाता, जोहार मायबाप, व शेवटी प्रभू
अजी गमला या भैरवीने तिने आपल्या गायनाचा शेवट केला. जोरकस आलाप, ताना, व
भारदस्त आवाजाने तिने सुद्धा श्रोत्यांची वाहव्वा मिळविली. या गायन कार्यक्रमाला तिचे गुरु
देवीदास दातार यांनी सुद्धा समर्पक साथसंगत करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी र ए सोसायटी, जांभेकर विद्यालय, श्रीधर पाटणकर, वरद
सोहनी, संजू बर्वे, दिलीप केळकर इ.चे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटोसाठी मजकूर- खल्वायन संस्थेची २७८ वी मासिक संगीत सभा सादर करताना गोव्याचा
श्री अनय घाटे ( हार्मोनियम वादन ) यांना तबला साथ करताना श्री रुद्राक्ष वझे( गोवा ). व
गायन सादर करताना दापोलीची युवा गायिका कु.ऋतुजा ओक , सोबत तबला साथ – श्री
देवीदास दातार ( दापोली ).हार्मोनियम साथ – श्री.अनय घाटे.