Ultimate magazine theme for WordPress.

अ. भा. मराठी महाकाव्यसंमेलनात कवयित्री वृषाली वसंत टाकळे यांचा गौरव

0 54

प्रसिध्द कवी अशोक नायगावकरांच्या हस्ते विशेष गौरव

स्वरचित कवितांचे बहारदार सादरीकरण करीत वृषाली वसंत टाकळे यांनी केले रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व

लांजा : नक्षत्राचं देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फाऊंडेशन,महाराष्ट्र यांच्यावतीने सातवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन पुणे येथे नुकतेच पार पडले. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व स्वेच्छासेवानिवृत्त बी एस एन एल कर्मचारी सौ. वृषाली वसंत टाकळे यांनी केले. या महाकाव्यसंमेलनामध्ये बहारदार कविता सादरीकरणासाठी सौ. वृषाली वसंत टाकळे यांचा प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
पुणे पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या सातवे अ.भा.मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनात चित्रकाव्य लेखन स्पर्धा, परिसंवाद, काव्यमैफल व प्रकट मुलाखतीने दोन दिवस रंगले. या महाकाव्यसंमेलनाचे उद्घाटक म्हणून अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले महाराज उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील उद्योजक कृष्णकुमार गोयल,ॲड.प्रफुल्ल भुजबळ, डाॅ.कैलास कदम, सुखदेव सोनवणे, नगराध्यक्षा सौ. शोभा कऊटकर, सौ.जया बोरकर, कर्नल साठे, आशिष कदम इ.मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले. स्वागताध्यक्ष शंभूदादा पवार हे होते.
या महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष असलेले कवी अशोक नायगावकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कवीला निरीक्षणाची तिक्ष्ण नजर पाहीजे. समाजाच्या प्रखरतेला, वेदनेला टिपता आले पाहीजे. समाजाची सांस्कृतिक भूक भागण्यासाठी अशा महाकाव्यसंमेलनाची गरज आहे. यावेळी प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत रंगतदार ठरली. ही मुलाखत, मुलाखतकार श्रीकांत चौगुले व प्रीती सोनवणे यांनी घेतली. नायगावकर यावेळी व्यक्त होताना म्हणले की, वाईतील सांस्कृतिक वातावरणाने आणि विश्वकोशातील ग्रंथालयाने मला समृद्ध केले. सुरुवातीला भावकविता लिहायचो. मुंबईत आल्यावर नामदेव ढसाळांशी मैत्री झाली. त्यांच्याबरोबर सगळ्या झोपडपट्ट्या फिरलो. समाजातील दुःख दैन्य बघितले. त्यानंतर सामाजिक कवितांकडे वळलो. कविता सादर करण्याच्या नायगावकरी शैलीबाबत विचारल्यावर ते दिलखुलास हसत म्हणाले, माझी शैली सहजपणे विकसित झाली. मी आयुष्यात ठरवून कोणत्या गोष्टी केल्या नाहीत. कवितेच्या आधी किस्सेवजा बोलत गेलो, ते प्रेक्षकांना आवडत गेले. त्यातूनच ही वेगळी शैली विकसित झाली. मिशा आणि हशा हे तुमच्या बाबतीत समीकरण झालं आहे. यावर ते सहजपणे म्हणाले, माझ्या मिशांची एक वेगळी ठेवण आहे, माझे हातवारे करणे, तुम्हाला सांगतो असं म्हणत श्रोत्यांशी संवाद साधणे. हे लोकांना आवडत गेले आणि एकच कवितासंग्रह नावावर असणारा हा कवी इतका लोकप्रिय झाला याचे मलाही आश्चर्य वाटते. मी गंभीर, अंतर्मुख करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या आहेत. भोपाळ दुर्घटनेवरील कविता तर ज्ञानपीठने प्रकाशित केली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी अनेक किस्से सांगितले. कविता वाचन केले. कवी अशोक नायगावकर यांना गौरवपत्र, मानपत्र, मानधनथैली, पुणेरी टोपी,शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या महाकाव्यसंमेलनात सहभागी कवी, कवयित्री यांना महाकाव्यसंमेलन स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वृषाली वसंत टाकळे यांनी यावेळी “आपल्या घरी”, “धावून ये हाकेला” व “माझा नवरा” या स्वरचित कवितांचे बहारदार सादरीकरण केले. तसेच नक्षत्राचं देणं काव्यमंचाविषयी आपले सुंदर मनोगत व्यक्त केले. या काव्य संमेलनातून अनेक कवी कवयित्रींना काव्य सादर करण्याची संधी मिळाली, चांगले व्यासपीठ मिळाले. तसेच काव्यलेखनासाठी प्रेरणा मिळाल्याचे सौ. वृषाली टाकळे यांनी सांगितले. काव्यप्रेमींसाठी रत्नागिरीमध्येही भविष्यात काव्यमैफल आयोजित करण्याचा मनोदय, आयोजक कवी वादळकार राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
महाकाव्यसंमेलनाच्या नियोजनात पियुष काळे, मोहन कुदळे, विनायक विधाटे, राहुल परदेशी, देवा कुॅंवर, मंगेश बिरादार, मंगेश शेलार, संतोष कोराड, साईराजे सोनवणे, निखिल खोल्लम, गणेश सोनवणे, यशवंत घोडे, सिध्द चिलवंत, रोहीत शिंदे, सौ. वृषाली टाकळे, चंद्रकांत सोनवणे, दिनेश चव्हाण, सुनिल बिराजदार, संतोष आवटे आदींनी पुढाकार घेतला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनात कवयित्री वृषाली वसंत टाकळे यांचा उत्तम सादरीकरणासाठी विशेष गौरव करताना प्रसिध्द कवी अशोक नायगावकर. सोबत अन्य मान्यवर.
Leave A Reply

Your email address will not be published.