Ultimate magazine theme for WordPress.

कोकणातील चित्रकारांच्या कलाविष्काराची छाप उमटणार कलानगरी कोल्हापुरात

0 41


सराय गॅलरीत चित्रप्रदर्शन 
रेहाच्या चित्रांची उत्सुकता
संगमेश्वर :- कोकणातील कलाकारांच्या कुंचल्यातून नेहमीच येथील सर्वांगसुंदर निसर्गाचे दर्शन होत असते . कोकणचे ग्रामीण जीवन , जुन्या वास्तू , नद्या – नाले जसे पर्यटकांना भुरळ घालतात तसेच ते कोकणातील चित्रकारांना देखील खुणावत असतात . निसर्गात रमणारा चित्रकार हा आपल्या रंग आणि कुंचल्याद्वारे निसर्गाच्या समीप पोहचण्याचा प्रयत्न करतो . निसर्ग आणि चित्रकार यांच्या अंतर्मनाचा जेंव्हा मिलाप होतो त्यावेळी चित्रपटलावर हुबेहूब दृष्ये साकारली जातात . निसर्गाची ही अनोखी दृष्ये पाहून रसिक अक्षरशः भारावून जातात . चित्राकृतीतून बोलणारा निसर्ग कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरकरांच्या भेटीसाठी सहा चित्रकारांच्या माध्यमातून १३ मे पासून येत आहे . यामध्ये खास वैशिष्ट्य आहे ते ९ वर्षीय बालकलाकार रेहा राजेशिर्के हिच्या कलाकृतींचे . 
कोकणातील ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के हे कलाचळवळीतील मोठे नाव . नुकतेच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले . घरात दु:खद प्रसंग घडून देखील कलेसाठी धडपडणारे त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते . गेले काही दिवस त्यांच्या मनात कोकणातील काही कलाकारांच्या कलाकृतींचे कलानगरी असणाऱ्या कोल्हापूर मधील ‘ सराय ‘ गॅलरीत प्रदर्शन भरविण्याचे ठरत होते . राजेशिर्के यांनी स्वतः पुढाकार घेऊन सहा कलाकारांची निवड केली आणि कोल्हापूरची सराय गॅलरी भाड्याने घेऊन १३ मे ही प्रदर्शनाची तारीख देखील पक्की केली . १३ मे ते १८ मे असे सहा दिवस सुरु रहाणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन १३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे . या कला प्रदर्शनात खास आकर्षण असणार आहे ते ९ वर्षांच्या रेहा राजेशिर्के या बालकलाकाराच्या कलाकृतींचे . रेहा ही प्रकाश राजेशिर्के यांची नात असून बालपणापासून तिच्या अवतीभोवती चित्र आणि शिल्प पहायला मिळाल्यामुळे तिला कलेची ईश्वरी देणगी प्राप्त झाली आहे . रेहाची रेषा बोलकी असून त्यातून तिला काहीतरी वेगळे सांगायचे असते , याची जाणीव होते . बाल कलाकाराच्या अंतर्मनाचा वेध घेणाऱ्या रेहाच्या कलाकृती रसिकांना भुरळ घालतील , यात कोणतीही शंका नाही . आजोबा प्रकाश राजेशिर्के यांच्या अंगाखांद्यावर खेळताना त्यांच्याकडून नकळत कलेचे धडे घेणारी रेहा भविष्यात कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल याची चुणूक तिच्या कलाकृतीतून मिळत आहे . 
उर्वरीत कलाकारांमध्ये निसर्गा जवळ आपला कुंचला आणि रंगांच्या माध्यमातून नियमित संवाद साधणारे निसर्ग चित्रकार  विष्णू परीट , प्रणय फराटे याबरोबरच प्रकाश महिनकर , संकेत कदम , दिगंबर मांडवकर यांच्या कलाकृतींचादेखील समावेश आहे . विष्णू परीट यांचे जलरंगावर कमालीचे प्रभुत्व आहे . आजवर त्यांची अनेक प्रदर्शने भरली असून विविध पुरस्कारांवर त्यांचे नांव कोरले गेले आहे . निसर्ग चित्रात हिरव्या रंगाच्या विविध छटांचा सहज वापर करण्यात परीट यांचा हातखंडा आहे . प्रवाही रंगलेपन आणि निसर्गाचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती ही त्यांच्या चित्रांची खास वैशिष्ट्ये आहेत . निसर्गाचे हुबेहूब दर्शन घडविणाऱ्या परीट यांच्या चित्रांना रसिकांकडून सतत मोठी मागणी होत असते . 
प्रणय फराटे हा युवा कलाकार सह्याद्री कलामहाविद्यालय सावर्डे येथे रंग आणि रेखाकलेचे शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असून त्याच्या बोटात , तर  परमेश्वराने अक्षरशः जादूच भरली आहे . समोर दिसणारे निसर्गाचे दृष्य आपल्या रंग आणि कुंचल्याने आहे तसे नव्हे , तर त्यापेक्षाही सुंदर आणि लोभसवाणे करण्याची ताकद प्रणय मध्ये आहे . दररोज निसर्गासोबत बसून जलरंगचित्रणाचा कमालीचा सराव हे प्रणयच्या यशाचे गुपीत आहेत . प्रणय फराटेला आजवर अनेक निसर्गचित्रण स्पर्धेत पारीतोषिक प्राप्त झालेली आहेत . पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात सह्याद्री कला महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली होती . यावेळी प्रणय फराटेने साकारलेले कर्णेश्वर मंदिराचे चित्र आदित्य यांना भेट देण्यात आले होते . यावेळी प्रणयचा कलाविष्कार पाहून आदित्य ठाकरे यांनी देखील प्रणयच्या कलेचे कौतूक करुन त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली होती . 
कोल्हापूरची ओळख कलानगरी अशीच आहे . अनेक नामवंत कलाकारांच्या पंढरीत कोकणातील सहा कलाकार आपला कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविणार आहेत याची कलारसिकांना मोठी उत्सुकता आहे . शिवशिल्प कॉलनी , विद्यापीठ मार्ग सम्राटनगर येथील ” सराय गॅलरी ” येथे १३ मे ते १८ मे दरम्यान सहा दिवस सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे चित्रप्रदर्शन रसिकांसाठी निशुल्क पहाता येणार आहे . रसिकांना ज्या कलाकृती आवडतील त्या खरेदी करण्याची संधी देखील मिळणार आहे . कोल्हापूर मधील कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी केले आहे .
(फोटो ओळी : १) रेहा राजेशिर्के हिची चित्रे २ / ३ ) चित्रकार विष्णू परीट यांची जलरंगांतील चित्रे ४ / ५ ) युवा चित्रकार प्रणय फराटे याची जलरंगांतील चित्रे )

Leave A Reply

Your email address will not be published.