https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीत चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण कीर्तन सप्ताह रंगणार

0 62


२९ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान आयोजन

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. २९) ते ४ ऑगस्टपर्यंत मंडळाच्या जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतीगृहाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सप्ताह होईल. सप्ताहाचे हे ११ वे वर्ष आहे. यात पनवेल, पुणे, गोवा, संगमेश्वर, अलिबाग येथील नामवंत कीर्तनकार या सप्ताहात कीर्तनसेवा रुजू करणार आहेत.

२९ जुलैला पहिले पुष्प रंगवणार आहेत पनवेलचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप अनंत उर्फ नंदकुमार कर्वे. चित्रसेन गंधर्व (कृष्णार्जुन युद्ध) यावर ते कीर्तन करतील. श्री. कर्वे यांनी अ. भा. गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद (हार्मोनियम) व संगीत अलंकार (गायन) ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. सुमारे ३१ वर्षे त्यांनी एचओसी स्कूल रसायनी येथे संगीत शिक्षक म्हणून सेवा बजावली. संगीतकार, मार्गदर्शक, कवी, हार्मोनियमवादक म्हणून सुपरिचित आहेत. १९८४ पासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक या ठिकाणी त्यांचे कीर्तने झाली आहेत. आशाकिरण मानव सेवा, कीर्तनरत्न, पूर्णवादी कीर्तनकार, कीर्तन भूषण, कीर्तन भास्कर या पदव्यांनी ते सन्मानित आहेत.

३० जुलै रोजी पुण्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप उद्धवबुवा जावडेकर हे नागिण या आख्यान विषयावर कीर्तन रंगवतील. कीर्तनकलानिधी श्री. कोपरकरबुवा, कीर्तनसम्राट गोविंदस्वामी आपळे, करविर पीठाधीश शंकराचार्य महाराज (कऱ्हाडकर बुवा) हे त्यांचे कीर्तनातील गुरु आहेत. गेल्या ४० वर्षांत त्यांनी सुमारे ६५०० कीर्तने ठिकठिकाणी केली. नारद विद्यामंदिर (पुणे) येथून त्यांनी कीर्तनाचा ६ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांची कीर्तने सादर झाली. कीर्तनभास्कर, कीर्तनसूर्य, कीर्तनगौरव अशा पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

३१ जुलै रोजी गोव्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप केशव माधव शिवडेकर हे स्थालीहरण हा आख्यान विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. श्री समर्थ रामदास प्रतिष्ठान संचालित कीर्तन विद्यालय (कवळे), कपिलेश्वरी (फोंडा, गोवा) येथे त्यांचे कीर्तन अध्ययन झाले. कै. हभप रामचंद्रबुवा कऱ्हाडकर, ब्रह्मीभूत विद्याशंकर भारती स्वामी, करवीर पीठाधीश, हभप श्रीपादबुवा ढोल्ये, कीर्तनकलानिधी हभप अनंतबुवा मेहेंदळे, हभप नारायणशास्त्री गोडबोले, हभप दत्तदास घागबुवा हे त्यांचे कीर्तनातील गुरु. काही वर्षे तबलावादनाचे शिक्षणही त्यांनी घेतले. वेदशास्त्रसंपन्न न्यायचुडामणी पुरुषोत्तमशास्त्री शिकेरकर यांच्याकडून त्यांनी वेदाध्ययन धडे घेतले आहे. पणजी आकाशवाणीची त्यांनी बी हाय ही ग्रेड प्राप्त आहे. कीर्तन स्वरताल धुरंधर या पदवीने ते सन्मानित आहेत.

१ ऑगस्ट रोजी पुण्याच्या हभप डॉ. प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर या लोकमान्य टिळक आख्यान विषयावर कीर्तन सादर करतील. यांचे संगीतातील शिक्षण गुरु व आई डॉ. श्रुती देशपांडे यांच्याकडे व कीर्तनाचे मार्गदर्शन वडील डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्याकडे झाले. पुणे, औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. नारदमंदिरचा (पुणे) युवती कीर्तनकार हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सन २००९ पासून संतकवी दासगणु महाराजांच्या कीर्तन परंपरेचा महाराष्ट्रभर प्रसार, प्रचार त्या करत आहेत. आधुनिक महिपती संतकवि श्री दासगणु महाराजांच्या कीर्तनाख्यानातील सांगितीक आयामांचा चिकीत्सक अभ्यास या विषयातील संशोधन कार्याबद्दल त्यांना विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.

२ ऑगस्ट रोजी रेवदंडा-अलिबाग येथील हभप संदीप केळकर हे आख्यानविषय कीचकवध यावर कीर्तन सादर करतील. केळकर यांचे कीर्तनातील गुरु वडिल हभप वामनबुवा केळकर असून ते तबला, गायन आणि कीर्तन विशारद आहेत. कीर्तन जुगलबंदी, सुगम संगीत गायन, संगीत नाटकांमधून भूमिका यातही त्यांनी ठसा उमटवला आहे. गेली ३५ वर्षे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांत व परदेशात ओमान येथे एकूण तीन हजार हून अधिक कीर्तने सादर केली आहेत.

३ ऑगस्टला पुण्याच्या हभप सौ. स्मिता आजेगावकर या श्री समर्थ रामदास स्वामी या आख्यान विषयावर कीर्तन रंगवतील. एमए (इंग्रजी) पदवी त्यांनी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. त्यांचे कीर्तनाचे शिक्षण पती हभप प्रभाकरबुवा यांच्याकडे झाले. सासरे हभप तुकारामबुवा हे परभणीतील नामवंत कीर्तनकार. स्मिता आजेगावकर यांनी संगीत नाटकांतून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २५ वर्षांत महाराष्ट्रासह अन्य राज्यांत त्यांनी कीर्तने केली आहेत. प्राचार्य राम शेवाळकर, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर आदींनी त्यांच्या कीर्तनकलेची प्रशंसा केली आहे.

४ ऑगस्टला सांगतेचे कीर्तन हभप श्रीनिवास पेंडसे हे पृथ्वीराज चौहान या आख्यानविषयावर सादर करणार आहेत. धामणी, संगमेश्वर येथे श्रीनिवास पेंडसे हे कीर्तनकार आणि प्रवचनकार असून त्यांची अनेक कीर्तने, व्याख्याने ऐतिहासिक विषयांवर असतात.

या कीर्तन सप्ताहाचा आस्वाद सर्व कीर्तनप्रेमी, रसिकांनी घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.