रत्नागिरी : आर्ट क्रिएशन संस्थेतर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन जलतरंगातील निसर्गचित्र स्पर्धेत रत्नागिरीतील चित्रकार व फाटक हायस्कूलचे कलाशिक्षक निलेश पावसकर यांना रजतपदक आणि १५ हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. त्यांनी समुद्रकिनारा आणि त्यावरून बैलगाड्यांचे सुरेख निसर्गचित्र चितारले.
आर्ट क्रिएशनचे संस्थापक कलाकार जितेंद्र गायकवाड व सहसंस्थापक रूपेश पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन गेल्या महिन्यात केले होते. या स्पर्धेत विविध ठिकाणचे ८५ चित्रकारांनी सहभाग घेतला होता. या चित्रांचे परीक्षण गणेश हिरे व अमित धने यांनी केले. सुवर्णपदक विजेत्याला २५ हजार रूपये, रजतपदक १५ हजार रू. व कांस्यपदक १० हजार रुपयांचे बक्षिस आणि उत्तेजनार्थ बक्षीस ५ हजार रू. व ३ हजार रू. देण्यात आले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक निकेतन भालेराव, रजतपदक निलेश पावसकर, कांस्यपदक चासकर यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ प्रथम आकाश खेतावत, द्वितीय संदेश मोरे, आणि परीक्षकांकडून बक्षीस रूपेश सोनार, चंद्रशेखर रांगणेकर, दिलीप दुखाने, साहिल कुमार (आसाम) यांना जाहीर झाले.