नाणीज : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे बुधवारी कोसळत्या जलधारांच्या साक्षीने गुरुपौर्णिमेचा सोहळा अपार उत्साहात पार पडला. उपस्थित लाखो भाविकांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समोर सुंदरगडावर जागा मिळेल तिथे बसून गुरुपूजन केले.
यावेळी आशीर्वाद देताना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले, “ गुरुपौर्णिमा म्हणजे वैदिक सनातन संस्कृतीतील फार मोठी अनमोल भेट आहे. हा वैदिक सनातन धर्म ऋणानुबंध जोपासणारा आहे. या धर्माची मूल्ये आकाशाला गवसणी घालणारी व विश्वबंधुत्व जोपासणारी आहेत. गुरूंच्या ठाई, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून येणार दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.”
रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार पाऊस आहे. तरीही मंगळवारी रात्रभर भाविक सुंदरगडावर येत होते. अगदी पहाटेपर्यंत खासगी वाहने, एस.टी, रेल्वे अशा मिळेल त्या वाहनांने भाविक गटागटाने येत होते. पहाटेपासून सर्व अटोपून त्यांनी पूजेसाठी जागा पटकावल्या होत्या. जवळचे भाविक सकाळी आले. हा हा म्हणता सारा सुंदरगड भाविकांनी फुलून गेला. सकाळी बरोबर आठ वाजता संतपीठावरची सर्व तयारी पूर्ण झाली होती. वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी स्थानापन्न झाला. याच दरम्यान जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व प.पू. कानिफनाथ महाराज यांचे सहकुटुंब सुंदरगडावर आगमन झाले. त्यांनी प्रथम संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन आपल्या सर्व सद्गुरूंचे दर्शन घेतले. संतपीठावर आल्या जगद्गुरू श्रींनी सर्वांना हात उचावून आशीर्वाद दिले. त्यानंतर विधिवत, मंत्रोच्चारात गुरूपूजन सोहळा सुरू झाला.
दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
दुपारी महामार्गावरील अपघातग्रस्तासाठी आणखी दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. दक्षिणपीठाचे उत्ताराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज व संस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत व हस्ते हा सोहळा झाला. रुग्णवाहिका सेवा ही संस्थानची एक महत्वाची लोकसेवा आहे.
संतपीठावर प्रातिनिधीन एक भक्त गुरूपूजन करीत होते. शौचे गुरूजी सांगतील त्या पद्धतीने सारे भाविक पूजन करीत होते. स्वामीजींच्या प्रतिमा सर्वांकडे होत्या. सर्वांची कृती एकाचवेळी असायची. एकाचवेळी हळदकुंकू, एकाचवेळी घंटानाद, एकाचवेळी आरती झाली. 8 ते 12 या काळात हा गुरूपूजन सोहळा झाला.
गेले दोन दिवस 24 तास महाप्रसाद सुरू आहे. लोक रांगेने, शिस्तबद्धरित्या महाप्रसाद घेत असेत. संस्थानतर्फे पाणी, आरोग्य, औषधोपचारांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. दोन दिवस सुरू असलेल्या आरोग्य शिबिराचीही आज सायंकाळी सांगता झाली.
आज दिवसभर पाऊस सुरू होता. मात्र त्याची तमा न बाळगता भाविक येत होते. सोहळ्यात सहभागी होत होते. सुंदरगड व नाथांचे माहेर अशा सर्व मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. चरणदर्शनासाठीही रांगा होत्या. रात्री दक्षिणपीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज व त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. त्यांनी सद्गुरू कसा असतो, त्याचे व भक्तांचे नाते कसे असते, गुरपौर्णिमेचे महत्व यांचा उहोपोह केला. प्रवचनानंतर रात्री वारी उत्सवाची सांगता झाली. मोठ्या संख्येने भाविक रात्रीच आपापल्या गावी परतले.