https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीतील १ हजार ५०० हजार युवकांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवणार : उद्योगमंत्री उदय सामंत

0 96


१९ हजार ५५० कोटींच्या वेल्लोर सेमिकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन


रत्नागिरी, दि. ११ : तब्बल १९ हजार ५५० कोटींच्या वेल्लोर सेमिकंडक्टर प्रकल्पासाठी रत्नागिरीतील १ हजार ५०० युवकांना परदेशात प्रशिक्षण देवून, इथल्या प्रकल्पात रोजगाराची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर धीरुभाई अंबानी यांच्या डिफेन्स क्लस्टरमधून देशाच्या संरक्षणाचा प्रदूषणविरहीत प्रकल्प होणार आहे. या दोन्ही प्रकल्पातून ३८ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी अशा प्रकल्पांचे समर्थन केले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
एमआयडीसीच्या झाडगाव ब्लॉकमधील जागेवर कुदळ मारुन आणि कोनशिलेची फित कापून वेल्लोर सेमिकंडक्टर प्रकल्पाचे आज उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यानंतर श्रध्दा साफल्य हॉलमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमास व्हीआयटी सेमिकॉन्स पार्क प्रा. लि. चे संचालक ताजपूर संपथ कण्णन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उद्योजक दीपक गद्रे, प्रशांत पटवर्धन, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, सचिन राक्षे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, सरपंच फरिदा काझी, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, व्हीआयटी पार्कचा प्रकल्प हा अमेरिकन बेस कंपनीचा आहे. भारतात तामिळनाडू बेस आहे. मुलांनी शिकून परदेशात नोकरीसाठी जावे, असे आई-वडिलांचे स्वप्न असते. परंतु, ते स्वप्न या प्रकल्पामध्येच पूर्ण करता येवू शकणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या थेट दोन हजार कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ५०० रत्नागिरीतील असणार आहेत. त्यांना परदेशात आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि पहिल्या पाचमध्ये रत्नागिरीचा जीडीपी आणण्यासाठी अशा प्रकल्पांच्या पाठिशी ताकदीने उभे राहिले पाहिजे.
उद्योगपती अंबानींशी स्वत: चर्चा केल्याचे सांगून, उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, डिफेन्स क्लस्टर्सचा दुसरा उद्योग रत्नागिरीत आणला आहे. हा प्रदूषण विरहीत प्रकल्प असून, देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प आहे. तीन वर्षानंतर इथे तयार झालेली बंदूक सैनिकांच्या हातामध्ये असेल. अशा प्रकल्पांचे समर्थन आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे. दोन्ही प्रकल्पातून ३८ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी शिकून, अशा कंपन्यांमध्ये काम केले पाहिजे. ९० टक्के रत्नागिरीकर अशा कंपन्यांमध्ये काम करीत असल्याचे सांगताना आणि ऐकताना अभिमान वाटला पाहिजे, असेही ते म्हणाले.
संचालक श्री. कण्णन म्हणाले, सेमिकंडक्टर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळावर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यावर महाराष्ट्रात रत्नागिरीत सर्वप्रथम आम्ही येत आहोत. सेमिकंडक्टरमध्ये तैवान, चीन आणि हाँगकाँग यांची मक्तेदारी आहे. या सर्वांचा लिडर म्हणून तैवानकडे पाहिले जाते. इथून पुढे मेड इन इंडिया म्हणून या प्रकल्पातील उत्पादन नावारुपाला येतील. सिलीकॉनपासून चिपपर्यंत प्रॉडक्ट तयार केले जाणार आहेत. निश्चितच भविष्यात पहिल्या पाचमध्ये रत्नागिरीचा जीडीपी असेल. रत्नागिरीमध्ये आम्हाला ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. ३३ हजार ६२० रोजगार संधी यामधून उपलब्ध होणार आहेत.
श्री. पटवर्धन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास उद्योजक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.