मिरजोळे येथील मंगळागौर स्पर्धेत योगा ग्रुपला प्रथम पारितोषिक
संस्कृती ग्रुप द्वितीय तर मधलीवाडी येथील सखी ग्रुप तृतीय क्रमांकाचा मानकरी
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या सहकार्याने उदय सामंत फाउंडेशन व शिवसेना तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेत योगा ग्रुपने प्रथम, संस्कृती ग्रुपने द्वितीय तर मिरजोळे मधलीवाडी येथील सखी ग्रुपने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
मिरजोळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात मंगळवार दि. १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मंगळागौरीच्या स्पर्धेला शेकडो महिलांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी किरण आणि उदय सामंत यांच्या मागे असेच भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाची सुरुवात कौसर पावसकर या मुस्लिम महिलेच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली.
सोळा संघांचा स्पर्धेत सहभाग
मिरजोळे जिल्हा परिषद गटाच्या मंगळागौर स्पर्धेच्या कार्यक्रमात १६ संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये योगा ग्रुप संघाने प्रथम क्रमांक फटकावला आहे. या संघाला दहा हजार रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संस्कृती ग्रुप मिरजोळे हा संघ ठरला. या संघाला सात हजार रुपये रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले तर तिसरा क्रमांक सखी ग्रुप मधलीवाडी मिरजोळे या संघाने मिळवला. या संघाला पाच हजार रुपये रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले.
स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी कालिका देवी संघाची निवड झाली. या संघाला तीन हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून भारती चांदोरकर, अस्मिता केळकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनया गावडे, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, युवा सेना प्रमुख तुषार साळवी, सरपंच गजानन गुरव, माजी सरपंच श्री. संदीप तथा बावा नाचणकर, बाळ सत्यधारी महाराज, राजू तोडणकर, शरद पाटील, संजय पंडये, भिकाजी गावडे, महिला विभागप्रमुख शुभांगी पंडये, विद्याताई बोंबले, अपर्णा बोरकर, साक्षी कुमटेकर, पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील, दीपक मोरे, समीर इंदुलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.