आरवलीतील गडनदीत तरुण बुडाला
- पाणबुड्याच्या मदतीने शोधकार्य सुरूच
आरवली : नातेवाईक महिलेसोबत संगमेश्वर तालुक्यातील गड नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेला २१ वर्षीय तरुण नदीपात्रात बुडून बेपत्ता झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर 24 तास उलटूनही नदीपात्रात बेपत्ता तरुणाचा शोध लागलेला नाही. अनुभवी पाणबुड्यांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू आहे.
खेरशेत येथील प्रशांत प्रभाकर भागवत हा त्याची नातेवाईक असलेल्या प्रतीक्षा प्रदीप यादव महिलेसोबत आरवली गुरववाडीनजीक गडनदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेला होता.
यावेळी कपडे ठेवण्यासाठी नेलेला प्लास्टिकचा टब नदीच्या पाण्यातून वाहून जाऊ लागल्यामुळे तॊ पकडण्यासाठी प्रशांत याने नदीपात्रात उडी मारली असता तॊ पुन्हा बाहेर आलाच नाही, असे तेथील प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
प्रशांत याचा शोध घेण्यासाठी माखजन तसेच संगमेश्वर पोलीस, आरवली गावचे सरपंच नीलेश भुवड, संतोष पेडणेकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष दीपक शिंगण, धर्मेंद्र कोंडविलकर, मकरंद परकर, मंगेश परकर, मुकुंद जाधव, बाळा सुर्वे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.
या घटनेची माहिती बेपत्ता प्रशांत याचे वडील प्रभाकर बाळकृष्ण भागवत यांनी माखजन पोलीस दूरक्षत्रात दिली असून पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी हे अधिक तपास करत आहेत.
नदीपात्रात बेपत्ता प्रशांतचा शोध घेण्याचे काम सुरूच आहे. परंतु घटनेनंतर चौवीस तास उलटूनहि अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.