सातासमुद्रापार बाप्पाची आराधना
युरोपमध्ये मराठमोळ्या युवकांनी साजरा केला गणेशोत्सव
गुहागर : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होतो. महाराष्ट्रतील मराठमोळ्या युवकांनीहि युरोपमधील स्लोवाकी नित्रा येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. ही सर्व तरुण मंडळी एप्रिल महिन्यात नोकरीच्या निमित्ताने परदेशात आले आहेत.
महाराष्ट्रातून निखील रेवाळे (गुहागर, रत्नागिरी), जयेश शेलार (पुणे चाकण), केतन सोनार (जळगाव), चेतन जाधव (पुणे), प्रशांत भाटे (कोल्हापूर), सचिन मोरे (पुणे),
ऋषिकेश चव्हाण (सातारा), निखील बोराडे (पुणे), विद्या कोरडे, तन्मई सुतार (भोसरी), अक्षय शेजवळ, महेश चाकवे (जुन्नर), अपूर्व कदम (गुहागर), अलिषा भालेराव (लोणावळा), पल्लवी राठोड (नाशिक), कपिल मोरे (मुंबई),
ललित दुसाने (नाशिक), नितेश तुपे (रायगड) आदी तरुण मंडळी वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलाखती देऊन युरोपमध्ये पहिल्यांदाच नोकरीसाठी बाहेर आले आहेत.
महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आम्ही जरी परदेशात असलो, तरी सांस्कृतिक परंपरेचे जतन आम्हाला करता येत आहे. गणेशोत्सवात घरची आठवत येत असली तरी हा उत्सव सातासमुद्रापार साजरा करताना खूप आनंद होत आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा केला जात असून, ‘श्री’चे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.
– निखिल सुनील रेवाळे, गुहागर.
हे सर्वजण जग्वार लँड रोव्हर या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरीला आहेत. या तरुणांमधील जळगाव येथील केतन सोनार याने येतानाच आपल्या गावातून श्रींची मूर्ती आणली होती. हीच गणरायाची मूर्ती श्री गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात स्थानापन्न करण्यात आली. पाच दिवसांच्या गणेशाला सर्वांनी आपल्या हाताने मोदक बनववून नेव्यद्य बनविला. आपल्या घरातील गणेशोत्सवाप्रमाणे सर्वांनी आरती आणि इतर कार्यक्रम केले. प्रत्येकाच्या कामाच्या वेळेनुसार बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात आली. आणि तेव्हढ्याच जल्लोषात बाप्पाची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.