सावर्डे : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांनी ऑस्ट्रेलिया ब्रिसबेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँड येथून मास्टर इन ॲग्रीकल्चर सायन्स इन द फिल्ड ऑफ हॉर्टिकल्चर हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
नुकत्याच ब्रिसबेन येथील विद्यापिठात आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभाला आमदार शेखर निकम, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती असलेल्या पूजा निकम, सई व मुक्ता निकम उपस्थित होते.
दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत अनिरुध्द याने अनेक लीडरशिप उपक्रम, त्याचबरोबर संशोधन परिषदा, इतर शैक्षणिक व संशोधन कार्याची एकूणच कार्यक्षमता, याच्या अवलोकनावर काम केले. या त्याच्या कामाची दखल घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँड अकादमी आणि वीसी कमिटीने त्याला यावर्षीचा Dean’s Commendation Award for Academic Excellence-2024 हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा सोहोळा लवकरच होणार आहे.
अनिरुद्ध निकम यांनी ब्रिसबेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्व्न्सिलँड येथे जुलै 2022पासून ऑस्ट्रेलियन ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि आर्ट इनोव्हेशन यांच्यासोबत प्रोजेक्टवर काम केले. या प्रोजेक्टखाली त्याने केलेले काम ऑस्ट्रेलिया सरकारच्या पुढील वर्षीच्या पुस्तकात प्रकाशित होणार आहे.
आमदार शेखर निकम हे स्वतः कृषि विषयातले पदवीधर आहेत. त्यांनी मास्टर इन पॅथॉलॉजी या विषयातून मास्टर डिग्रीही घेतली आहे. यामुळे त्यांनी आपला सुपुत्र अनिरुद्ध याला कृषि विषयातील अद्ययावत शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले, पाठिंबा दिला. अनिरुद्धच्या या अनुभवाचा सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जागतिक विस्तारास, संशोधन आधारित संधी व एकूण गुणवत्तेच्या वाटचालीस नक्कीच फायदा होईल, असा विश्वास सह्याद्री परिवाराने व्यक्त केला जात आहे.