या योजनेच्या लाभार्थींना अपडेट करावी लागणार आधार कार्डवरील माहिती!
- संजय गांधी निराधर योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
रत्नागिरी : शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणा-या लाभार्थ्याना सुचना करण्यात येते की, आपले आधार कार्ड बँक खात्याशी अथवा पोस्ट खात्याशी संलग्न करुन त्याची झेरॉक्स प्रत व आधार कार्डची. झेरॉक्स प्रत संबधीत तहसील कार्यालयात त्वरीत जमा करण्यात यावी. डी.बी.टी पोर्टलवर लाभार्थ्याची माहिती अपलोड करण्याचे काम अंतीम टप्यात आले आहे.
लाभार्थ्यानी आपले आधार कार्डवरील माहिती अदयावत नसल्यास (नाव, पूर्ण जन्म तारीख, पत्ता) तत्काळ अदयावत करुन तहसील कार्यालयात जमा करण्यात यावे. तसे न केल्यास आपली माहिती डी.बी. टी. पोर्टलवर अपलोड होणार नाही. शासनामार्फत देण्यात येणारे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अनुदानाच्या लाभापासून वंचित राहाल याची कृपया नोंद घेण्यात यावी, असे कळवण्यात आले आहे.
जिल्हयात निराधार, अंध, अपंग, शारीरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, या सर्व दुर्बल घटकासाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने शासना मार्फत संजय गांधी निराधार अनुद योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यांत येते. दुर्बल घटक असलेल्या लाभार्थ्याना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळावा याकरिता सर्व लाभार्थ्याची माहिती डी.बी.टी पोर्टलवर अपलोड करणेचे काम तालुकास्तरावर चालुं आहे. डी.बी.टी पोर्टलव्दारे लाभार्थ्याना शासनामार्फत देणेत येणारां लाभ हा तत्काळ देण्यासाठी हे पोर्टल विकसीत करण्यात आलेले आहे.