धामणसे येथे पुलाच्या बांधकामाचे ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन
- धामणसे येथील कानडे काकांच्या दातृत्वाने विकासकामाची मुहूर्तमेढ
धामणसे : महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री, भाजपा नेते ना. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील धामणसे बौद्धवाडी चौकेवाडी हटवाडी रस्ता ग्रा. मा. १७३ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी गावातील ज्येष्ठ, दानशूर श्री. कानडे काका यांनी नि : स्वार्थी भावनेने जागा उपलब्ध करून संबंधित विकासकामात आपला सिंहाचा वाटा उचलला, याबद्दल श्री. चव्हाण यांनी गौरवोद्गार काढत त्यांचा सन्मान केला.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सह-प्रभारी बाळ माने, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, मा. आमदार विनय नातू, जि. प. रत्नागिरीचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, मा. जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, रत्नागिरी (उ.) तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, धामणसे गावचे सुपुत्र व भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुलकर्णी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. प्रतीक देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याबद्दल बोलताना बाळ माने म्हणाले, “धामणसे गावातील लोकांनी भाजपाला आत्तापर्यंत भरभरून साथ दिली असून याची जाणीव प्रत्येकाला आहे. यापुढेही साथ राहील याबाबत खात्रीही आहे. आमचे दायित्व म्हणून हे काम आम्ही सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणले आहे.” रवींद्र चव्हाण यांनी लोकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीबद्दल आभार मानले. “मा. मोदीजींच्या गौरवशाली नेतृत्त्वाखाली आपल्या विकासाला चालना मिळत आहे. यावेळी आपण पुढाकार घेऊन आपल्याला हवा तसा पूरक विकास घडवून आणण्यासाठी आपण या विकास यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा.” असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांनी यावेळी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिल्या. गेल्या २५ वर्षांचा लढा आज यशस्वी झाला. याबाबत ना. रवींद्र चव्हाण साहेब, त्यांचे स्वीय सहायक श्री. अनिकेत पटवर्धन यांनी वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा करून जलद मान्यता मिळवून दिली. याबाबत त्यांचे मनस्वी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित ग्रामस्थ, नागरिक अभूतपूर्व संख्येने उपस्थित होते.