रत्नागिरीसाठी केंद्रीय ‘पीएम श्री स्कूल’ मंजूर!
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी दि. 26 जून 2023 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरानजीकच असलेल्या नाचणे येथे ‘पीएम श्री स्कूल’ या केंद्रीय विद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण खाते तसेच क्रीडा विभागामार्फत हा प्रस्ताव दीड वर्षापूर्वी केंद्राकडे पाठवण्यात आला होता.
या केंद्रीय विद्यालयाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक मूलभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. या मंजुरीबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
– आ. उदय सामंत, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ.
या संदर्भात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने मागणी केल्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय (PM Shri Schools) मंजूर केले आहे.