कोकण रेल्वेच्या पेडणे टनेलमधील घटनेचा आढावा घेण्यासाठी सीएमडी घटनास्थळी पोहचले
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडूरे तसेच पेडणे दरम्यान असलेल्या रेल्वे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोकण किनारपट्टी भागात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे गोव्याच्या हद्दीत कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथील बोगद्यामध्ये खालील बाजूने मोठ्या प्रमाणावर झऱ्यांचे पाणी अक्षरशः उसळी मारून वर येऊ लागल्यामुळे आधी मंगळवारी दुपारनंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र त्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर कोकण रेल्वेची या भागातून होणारी वाहतूक सुरू झाली होती. मात्र, पुन्हा या बोगद्यामध्ये रुळाच्या बाजूने खालील बाजूने मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्यामुळे रेल्वेची वाहतूक पुन्हा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, देशाच्या दक्षिणोत्तर भागात धावणाऱ्या मंगला एक्सप्रेस सारख्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्यामुळे बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध केली आहे.
BSNL क्र. 08322706480
- श्री सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे.
या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हे आपल्या अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पेडणे बोगद्यामध्ये रुळांच्या बाजूने बुडबुड्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे सध्या विस्कळीत असलेली रेल्वे वाहतूक नेमकी कधी पर्वत होईल, हे सांगणे अवघड झाले आहे. दरम्यान, उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोकण रेल्वेचे सीएमडी श्री झा हे घटनास्थळी पोहोचले आहेत.