उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी कटिबद्ध : ना. उदय सामंत
रत्नागिरी : उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये हे राज्य सातत्याने आघाडीवर राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याच्या उद्योग मंत्री पदाचा दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारलेल्या ना. उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या खाते वाटपात दुसऱ्यांदा राज्याचे उद्योग मंत्री बनलेल्या उदय सामंत यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले आहे की, उद्योग म्हणजे विकासाचं इंजिन. भारताचं ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राच्या उद्योगांकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राने औद्योगीकरणाची कास धरली आणि आज जागतिक नकाशावर एक प्रगतीशील राज्य म्हणून मानाचं स्थान मिळवलं. उद्योगाला चालना देऊन रोजगारनिर्मिती करण्यासाठी महत्त्वाचं कार्य करणाऱ्या उद्योग विभागाची जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर सोपवण्यात आली.
उद्योग विभागासोबत मराठी भाषा विभागाचीही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. या जबाबदारीचा मी विनम्रतेने स्वीकार करतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यानंतर मराठी भाषेचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
–उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.
या जबाबदारीसाठी माझ्या पक्षाचे नेते आणि मार्गदर्शक श्री. एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, तसंच राज्याची जनता यांचा मी ऋणी आहे. उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये हे राज्य सातत्याने आघाडीवर राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही नामदार सामंत यांनी म्हटले आहे.