रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे बुडबुड्यांच्या स्वरूपात कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊन विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक बुधवारी रात्री पूर्वपदावर आल्यावर रिकामी मत्स्यगंधा एक्सप्रेस (12619) ही गाडी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी बोगद्यातील रुळावरून यशस्वीपणे धावली. घटनास्थळी तब्बल १८ तास मेहनत घेतलेले शेकडो मजूर, २५ सुपरवायझर्स तसेच अधिकाऱ्यांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे विक्रमी वेळेत हे काम पूर्ण होऊ शकले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील भुयारी मार्गामध्ये रुळांच्या बाजूला जमिनीखालून मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक तब्बल १८ तासानंतर पूर्ववत झाली आहे. शंभरहून अधिक मजूर, २५ सुपरवायझर्स, चीप इंजिनियर स्तरावरील अभियंते, नॅशनल तसेच इंटरनॅशनल कन्सल्टंट यांच्या अथक परिश्रमातून बुधवारी रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी TFC म्हणजेच ‘ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट’ प्राप्त झाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे.
मडुरे ते पेडणे दरम्यान जोरदार पावसामुळे बुडबुड्यांच्या स्वरूपात रुळांच्या बाजूला जमिनीखालून चिखलमिश्रित मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्यामुळे कोकण रेल्वेने बुधवारी पहाटेपासून रेल्वे सेवा बंद ठेवली होती.
पेडणे येथील बोगद्यात उद्भवलेल्या समस्येमुळे रेल्वे सेवा खंडित झाल्यामुळे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते.
खंडित झालेली सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच बुधवारी रात्री आठ वाजून 35 मिनिटांनी TFC म्हणजेच ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यावर रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वे कडून कळवण्यात आले.
वंदे भारत तेजस एक्सप्रेससह तब्बल १९ गाड्या केल्या रद्द
पेडणे बोगद्यातील घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेससह जवळपास 19 गाड्या कोकण रेल्वेने रद्द केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्याआधी रेल्वेने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या आहेत. बुधवारी रात्री 8.35 नंतर कोकण रेल्वेची बंद पडलेली वाहतूक पूर्ववत झाल्यामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.