गणेशोत्सवात सर्व यंत्रणांनी जबाबदारी चोख पार पाडावी : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 4 गणेशोत्सव जिल्ह्यामध्ये शांततेत पार पडावा. गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत व सुखकर व्हावा, महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळावी. महामार्गावर गणेश भक्तांच्या मदतीसाठी मदत केंद्रांची स्थापना करावी. सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज दूरदृश्प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजापूर डॉ. जस्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत व सुखकर व्हावा याकरिता महामार्गावर गणेश भक्तांच्या मदतीसाठी मदत केंद्रांची स्थापना करावी या मदत केंद्रामध्ये प्राथमिक वैद्यकीय उपचार, पाणी, चहा आदीची व्यवस्था ठेवावी. महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे. महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबतही आढावा घेतला. योग्य ते नियोजन करण्यासंदर्भात निर्देशही दिले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, कशेडी घाटापासून ते राजापूर तालुक्यापर्यंत सर्व रस्त्यांची दुरुस्तीची कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी. जिल्ह्यात महामार्गावर सुविधा केंद्र उभारण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ करावी. या सुविधा केंद्रांवर वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा, पोलीस मदत केंद्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, मोफत चहा, बिस्कीट, पाणी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या.
गणेशोत्सव काळात रेल्वेने मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात येत असतात याकरिता रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर सुविधा केंद्र उभारण्यात यावेत.रेल्वे स्थानकावरुन एस. टी. स्थानकापर्यंत जाण्यासाठी अनेक प्रवासी रिक्षाने प्रवास करतात त्यावेळी रिक्षाभाडे नियमानुसार आकारण्याबाबत परिवहन विभागाने नियंत्रण ठेवावे तसेच गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करावे. रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा कार्यरत ठेवून रेल्वे मार्गावर अडचण निर्माण झाल्यास पर्यायी यंत्रणा उपलब्ध ठेवावी.
सणाच्या कालावधीमध्ये मिठाईची विक्री मोठ्या प्रमाणात होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने भरारी पथकांची नेमणूक करुन मिठाईमधील भेसळ तपासणी करावी. एखादा विक्रेता भेसळयुक्त अथवा मुदत संपलेल्या मिठाईची विक्री करताना आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यंमत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री वयोश्री योजनांचा आढावा घेतला.