राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत लांजा शाळेत पोषण मासचे उद्घाटन
लांजा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत लांजा बीट तर्फे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह उद्घाटन कार्यक्रम प्राथमिक शाळा क्र. एक या शाळेच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच लांजा बीटच्या मुख्य सेविका साधना पागी व 27 अंगणवाडीच्या सर्व सेविका व मदतनीस व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान सर्व अंगणवाड्यांमध्ये हिमोग्लोबिन तपासणी, आहार व आरोग्य याविषयी व्याख्यान, पोषण विषयावर आधारित रांगोळी स्पर्धा, पोषण विषयी जनजागृतीसाठी रॅली, पाककृती स्पर्धा इत्यादी वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती देताना मुख्यसेविका साधना पागी यांनी सांगितले.
शाळेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी आहाराचे महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमात पाककला स्पर्धा ठेवण्यात आली होती. शाळेतल्या शिक्षकांनी सदर स्पर्धेचे परीक्षण करून अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले. यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी शेटेवाडी अंगणवाडीच्या सेविका मीनल राणे (कोळसुकर) यांनी उपस्थितांचे आभार मानले.