https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रेल्वेची विनंती आहे हाता-पाया पडून स्टंट करून नका घेऊ हात-पाय मोडून!

0 178
  • मध्य रेल्वे कडून धोकादायक स्टंट करणाऱ्या व्यक्तीला शोधले, ज्याने आणखी स्टंटच्या प्रयत्नात एक हात आणि पाय गमावला

मुंबई : ट्रेन किंवा प्लॅटफॉर्म  यावर धोकादायक स्टंटबाजी करणे हे बेकायदेशीरच नाही तर जीवघेणे देखील ठरू शकते.  स्टंट करणाऱ्या व्यक्ती आणि इतर प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकणाऱ्या अशा जीवघेण्या स्टंट्स/ कृत्यापासून दूर रहावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. असे स्टंट केल्यानंतर काय होते, हे फरहत शेख याच्या उदाहरणावरून सहज लक्षात येईल.

मध्य रेल्वे प्रवाशांना आणि जनतेला अशा प्रकारच्या स्टंटबाजीत सहभागी न होण्याचे आणि अश्या घटना दिसल्यास तक्रार करण्यासाठी आवाहन करीत आहे

दिनांक १४ जुलै रोजी ट्विटर (X) वर पोस्ट झालेल्या एका व्हिडिओनंतर, मध्य रेल्वेने धोकादायक स्टंट्स करण्याविरूद्ध कठोर चेतावणी जारी केली आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा चालत्या ट्रेनमध्ये चढताना धोकादायक वर्तन करत असल्याचे दाखवले आहे. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्यासाठी आवश्यक पावले उचलली. वडाळा रोड येथील रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) चौकीने फुटेजमध्ये दिसणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

अखेर आरपीएफला त्या व्यक्तीचा त्याच्या घरीच शोध घेण्यात यश आले, ज्याचे नाव फरहत आझम शेख असून तो अँटॉप हिल, वडाळा येथील रहिवासी आहे. व्हिडिओमधील घटनेची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, त्याने दि. ७ मार्च रोजी शिवडी स्टेशन येथे छञपती शिवजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये उक्त स्टंट करण्याचे बेकायदेशीर कृत्य केले होते. त्याने पुढे खुलासा केला की, त्याला लाइक्स मिळविण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी मित्राने अवैध कृत्य रेकॉर्ड केले होते.

दि. १४ एप्रिल रोजी फरहतला मस्जिद स्टेशनवर वेगळा स्टंट करताना जीवघेणा अपघात झाला आणि त्यात त्याने डावा हात आणि पाय गमावला. रेल्वे प्रशासनाने त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याला दैनंदिन कामे करण्यात अत्यंत अडचणी येत आहेत. त्यांने एका व्हिडिओमध्ये सर्व प्रवाशांना अशा धोकादायक कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, असे स्टंट्स केवळ बेकायदेशीरच नाही तर जीवघेणे देखील आहेत.

स्टंट करणाऱ्या व्यक्ती आणि इतर प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकणाऱ्या अशा जीवघेण्या स्टंट्स/ कृत्यापासून दूर रहावे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते आणि सर्व लोकांना अशा धोकादायक कृत्यांचा प्रयत्न करू नये असे आवाहन करते. या कृतींचे घातक परिणाम होऊ शकतात त्यामुळे इतर प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य देत राहिले आहे आणि प्रवासी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत.

रेल्वे सर्व नागरिक आणि प्रवाशांना विनंती करीत आहे की, कोणीही ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करत असल्यास मोबाईल क्रमांक ९००४४१०७३५ किंवा १३९ वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. एकत्र काम करून, आपण सुरक्षित प्रवासाची परिस्थिती निर्माण करू शकतो आणि मृत्यू दर कमी करू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.