लांजातील हेरिटेज संस्थेच्या जावडे आश्रमशाळेची बुद्धिबळमध्ये विभागीय स्तरावर मजल!
लांजा : तालुक्यातील हेरिटेज संस्थेच्या माध्यमिक आश्रमशाळा जावडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी या निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गाजवली असून या आश्रमशाळेचा विद्यार्थी आता विभागस्तरावर लांजा तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर दर्शन वैशाली राजभरने याने पाचवी रँक पटकावली आहे. दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. लांजा तालुक्यातील २० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. त्यामध्ये हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी लांजा या संस्थेच्या माध्यमिक आश्रमशाळा जावडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी या निवासी शाळेच्या सहा मुली व दोन मुलगे अशा एकूण ८ विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता.
दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी जबरदस्त लढत दिली. दोन विद्यार्थी अगदी अखेरच्या फेरीपर्यंत पोहोचले. मात्र, एका विद्यार्थ्यांचा विजय थोडयाच पॉइंटने निसटला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात आश्रमशाळेच्या दर्शन वैशाली राजभर या विद्यार्थ्यांना पाचवी रँक मिळवून विभागस्तरावर मजल मारली आहे.
हेरीटेज संस्थेने माध्यमिक आश्रमशाळा जावडे, ता. लांजा ही निवासी शाळा सुरु करून सहा वर्षे होऊन सातवे वर्ष सुरु आहे. मागील सहा वर्षात जिल्हास्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या पाचामध्ये चमकणारा दर्शन वैशाली राजभर हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. आता विभागस्तरावर जावडे आश्रमशाळेचा विद्यार्थी दर्शन वैशाली राजभर हा लांजा तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
आश्रमशाळेच्या अन्य विद्यार्थ्यांनीही जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. जिल्हास्तरावर खेळण्याकरिता जाण्याआधी हेरीटेज संस्थेने लांजा येथील बुद्धीबळ मास्टर डॉ. सुदेश देवळेकर यांना मार्गदर्शनाकरिता निमंत्रित केले होते. डॉ. सुदेश देवळेकर यांनीसुद्धा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळातील नियम व त्या अनुषंगाने खेळाच्या ट्रिक्स सांगितल्या होत्या. जिल्हास्तरावर विजयी झालेल्या दर्शन राजभरचे हेरीटेजच्या अध्यक्षा, लांजा पंचायत समितीच्या माजी सभापती ऍड. अपर्णा भारती अनंत पवार व संस्थापक संतोष कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.