रत्नागिरी : नाट्यशोध रत्नागिरी या संस्थेच्या ‘ जिन चिक जिन’ या धमाल विनोदी नाटकाचा नाट्यप्रयोग नऊ मे रोजी श्री प.पु. स्वामी गगनगिरी आश्रम पानवल होरंबेवाडी येथे नुकताच रत्नागिरी सादर झाला. कोकणातल्या एका गावातल्या या कथेने प्रेक्षकांमध्ये हास्याची कारंजी फुलवली. कोकणातल्या सद्य स्थितीवर थोड विनोदी अंगाने पण तरीही परखड भाष्य करणार हे नाटक शेवटाला सर्वांना अंतर्मुख करत विचार करायला भाग पाडते.
काही वर्षांपूर्वी ज्या घरातून माणसांची वर्दळ होती, ज्यांचे दरवाजे सदोदित स्वागतोत्सुक असायचे ते दरवाजे आता कुलूपबंद होऊ लागलेत. घरातलं गोकुळ रीत होऊन एकाकी पडलेली ती बंद दार खिडक्या, त्या भिंती त्यांच्या नात्यांना आर्त साद घालत आहेत. काहीसा हाच आशय थोड्या विनोदी पद्धतीने मांडत शेवटी मात्र प्रत्येकाच्या भावनांना हात घालणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांच्या काळजात घर केलं.
कोकणातील एक ज्वलंत विषय विनोदी पद्धतीने सांगणारं आणि विकणं सोपं आहे पण जपणं कठीण या आशयाचं हे विनोदी नाटकं, ज्याच लेखनं श्री.मनिष साळवी यांनी एका मिश्किल पद्धतीने केलं आहे. सहज लिहलेले कोकणी भाषेतील संवाद यामुळे हे नाटकं खूप जवळचं वाटत. नाटकं दिसताना सोपं वाटत असलं तरी त्याचं दिग्दर्शन करणं खूप कठीण काम होतं आणि ते शिवधनुष्य दिग्दर्शक श्री. गणेश राऊत यांनी खूप सुंदररित्या पेलवलय. दिग्दर्शनातं केलेले नवीन प्रयोग प्रामुख्याने नाटकाचं कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम करतात. नाटकामध्ये लाईव्ह म्युझिक, काही उडती गाणी आणि नृत्य, उत्कृष्ट प्रकाश योजना, तेवढचं सुंदर कोकणी घराचं नेपथ्य यांच्या साहाय्याने जिवंत झालं. या नाटकाचं नेपथ्य – श्री. जॉनी अपकरे यांनी रजत भरणकर आणि तुषार बंडबे यांच्या साहाय्याने केलं.
या नाटकाची प्रकाश योजना – श्री. शेखर मुळ्ये यांनी केली आहे. तसेच या नाटकाला – श्री. ऋतुराज बोंबले यांनी कीबोर्ड, पार्थ देवळेकर यांनी पखवाज आणि आयुष कळंबटे यांनी ढोलकीची साथ दिली. या नाटकामध्ये राजू गावकार, आशुतोष आणि प्रियंका ही तिन्ही पात्र विशेष छाप पाडून जातात.
या नाटकात राजू गावकार – स्वप्नील धनावडे, आशुतोष – किरण राठोड, प्रियंका- सौ. आसावरी गणेश राऊत-आखाडे, प्रकाश काका – तन्मय राऊत, काकी – साक्षी कोतवडेकर, महेश – तुषार गिरकर आणि राजेश/ जिन- रोहन शेलार यांनी आपापल्या भूमिका उत्तमरित्या सादर करत नाटकात रंग भरले आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.