इ.१० वी, इ.१२ वी परीक्षेसाठी फार्म नं १७ साठी अंतिम मुदत २० डिसेंबर
रत्नागिरी दि. १३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी फार्म नं १७ भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून, अतिविलंब शुल्कने अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत बुधवार 20 डिसेंबर 2023 आहे, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
इ.१० वी व इ. १२ वी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रति दिन रु.२०/- स्वीकारुन नाव नोंदणी अर्ज सादर करण्याच्या तारखा ११ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ आहे. खाजगी विद्यार्थ्यांना इ.१० वी इ.१२ वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही अर्ज ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून ऑनलाईन अर्ज भरावा. त्यासाठीचे संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत. इ.१० वी साठी http://form17.mh-ssc.ac.in तर इ. १२ वी साठी http://form17.mh-hsc.ac.in आहे.
विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी संपर्कासाठी अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत.