उलवे येथे मनसेचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न
उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही उलवे नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण व पनवेल विधानसभा मतदार संघाच्या मनसे संवाद मेळाव्यात मनसैनिकांनी दिली. यावेळी या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी मार्गदर्शन करताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी सज्ज रहावे, धनुष्य बाणाचे चिन्ह दाबून बारणे यांना लोकसभेत पाठवावे असे आवाहन केले.
या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, अतुल चव्हाण, अविनाश पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, प्रवीण दळवी, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, महानगरप्रमुख योगेश चिले, महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पाचभाई, उरण तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. देशाचे नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे लोकहिताचे काम संपूर्ण जग पाहत आहे. सन २०१४ साली त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची जबाबदारी हाती घेतली आणि संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट आली. देश विकासाच्या बाबतीत आगेकूच करायला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर २०१९ ला देशातील नागरिकांनी पुन्हा त्यांना कौल दिला आणि देश झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करू लागला. या सर्व घटना घडत असताना जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केले. देशातील नागरिक पाठीशी खंबीर राहत असताना जगाने मोदींच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आणि आपल्या भारत देशाचा गौरव जगाच्या कानाकोपऱ्यातून झाला. आजच्या घडीला आपल्याच देशाला नाही तर संपूर्ण जगाला मोदीजींकडून खूप अपेक्षा आहेत त्यामुळे देशाचे हित कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार ही काळाची आणि जगाची गरज आहे. मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत असे जाहीर केले आणि संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. आणि या अनुषंगाने राजसाहेबांनी दिशादर्शक पावले उचलली. त्यांच्या भूमिकेला मनसैनिकांनी नेहमीच पाठिंबा दिला त्यांच्या आदेशाचे नेहमी पालन केले.याचा सर्व महाराष्ट्राला गर्व आहे. अडीच वर्षांपूर्वीचे राज्य सरकार फक्त फेसबुकवर होते त्यामुळे लोकांसाठी काम करणारे नेते आणि फेसबुकचे नेते लोकांना कळून चुकले आहेत. राजसाहेबांच्या निर्णयामुळे महायुतीला ताकद मिळाली असून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवधनुष्य उचलले आहे, याला अभिप्रेत होऊन काम करा आणि मावळचा धनुष्यबाण रूपाने खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.
देशाच्या भविष्यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे देशाचा अभिमान जगात टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर देशाचा विश्वास आहे. ८० कोटी लोकांना अन्न धान्य, कोरोना काळात देशासह इतर देशांनाही लस देणारा, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करणारा, देशातील पायाभूत सुविधा मजबूत करणारा, देशाला विविध योजनांच्या अनुषंगाने सक्षम करणारा, देशाचा जगात सन्मान ठेवणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला मिळाला आहे. देशाचा विकास करण्याबरोबरच संस्कृती परंपरा संवर्धन करण्याचे काम आणि देशाची अस्मिता टिकवण्याचे काम मोदीजी करत आहेत. त्यामुळे त्यांना साथ देत आप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शेकापची सत्ता राहिली मात्र त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविला नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचा झपाट्याने तर आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदार संघात कोट्यावधींची विकासकामे सुरु आहेत. याचा फायदा आप्पा बारणे यांना नक्कीच फायदा होणार असून मनसैनिकांची साथ मिळणार आहे.
ऍड. सत्यवान भगत, उरण तालुकाध्यक्ष- मनसे
आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी तळागाळात पोहोचले आहेत. त्यांची साथ खासदार श्रीरंग बारणे यांना आहे आणि राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाने मनसैनिक पाठीशी असून प्रत्येक ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करतील.
- दीपक कांबळी, जिल्हा उपाध्यक्ष- मनसे
स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने स्वाभिमानाच्या गोष्टी करू नयेत. पाचशे वर्ष आपला देव प्रभुराम ऊन पावसात होता त्याला सावलीत आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि उद्धव ठाकरे नुसत्याच स्वाभिमानाच्या गोष्टी करतायेत.
- योगेश चिले, पनवेल महानगर अध्यक्ष- मनसे