दादर, ठाणे, पनवेल, खेड रत्नागिरी, कणकवलीसह थीवी स्थानकावर थांबे
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये बहुचर्चित ठरलेल्या मडगाव -मुंबई सीएसएमटी वंदे भारतला अखेर 3 जून 2023 रोजी नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ‘कोरे’ मार्गावर गाडीचे नियमित सेवेचे वेळपत्रक मात्र अजून जाहीर व्हायचे असले तरी पुढील अवघ्या काही दिवसात ती ही सेमी हाय स्पीड ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे.
दरम्यान, दि. 3 जून रोजी उद्घाटनानंतर नियमित सेवा नेमकी कधीपासून सुरु होईल, हे रेल्वेकडून अद्याप जगाक्षहीर केलेले नाही. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून मडगाव मार्गावर धावताना ही गाडी पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनी, दादर सकाळी 5 वाजून 34 मिनिटांनी, ठाणे येथून सकाळी 5 वा. 54 मिनिटांनी, पनवेल येथून सकाळी 6 वा.32 मिनिटांनी, खेड येथून सकाळी 8 वाजून 26 मिनिटांनी तर रत्नागिरी येथून वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 9. वा. 50 मिनिटांनी सुटेल. कणकवली 11.22 वाजता, थीवी 12.30 वाजता तर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ही गाडी गोव्यात मडगावला पोहोचेल.
अशी आहेत वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये
मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. ती थीवी येथून 3.22 वाजता, कणकवली 4.20 वाजता, रत्नागिरी येथून 5 वाजून 50 मिनिटांनी तर खेड येथून 7 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. पनवेल येथून ही गाडी 9 वा. 2 मिनिटांनी, ठाणे 21 वा. 37 मिनिटांनी, दादर 10.07 वाजता तर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल.