बोरिवली स्थानकात उद्या होणार उद्घाटन ; ३ सप्टेंबरपासून नियमित फेऱ्या
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या बांद्रा ते मडगाव या नव्या साप्ताहिक कायमस्वरूपी गाडीचा शुभारंभ दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी होणार आहे. याबाबत रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार उद्घाटनाच्या फेरीला दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी बोरिवली स्थानकातून मडगावसाठी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दरम्यान, शुभारंभ गुरुवारी होत असला तरी या गाडीच्या नियमित फेऱ्या मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहेत. मडगाव ते बांद्रा अशी पहिली फेरी होईल.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील पश्चिम उपनगरातून कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सुरू होणार असल्याची चर्चा होती. अखेर बोर्डाने आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या वांद्रे टर्मिनस ते मडगाव (10115/10116) अशा कायमस्वरूपी गाडीला मंजुरी दिली आहे. या गाडीचा शुभारंभ सोहळा बोरिवली स्थानकात उद्या गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी होतो आहे.
या स्थानकांवर थांबणार नवी गाडी
बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी*, थिविम, करमाळी.