मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न!
उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे ) : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज. ए. ई. इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा उरण येथील शाळेतील मुलांनी विविध कार्यक्रम सादर करून मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला.
या गौरव दिनाचे उद्घाटन उरण तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून केले. या वेळेस एन. आय. हायस्कूल चे प्राचार्य एल .एम.भोये ,मुख्याध्यापिका ज्योती पाटील,शिक्षकवृंद मोहिनी पाटील, क्षमा थळी,विद्या पाटील, मिनाक्षी पोखरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रास्ताविकात विद्या पाटील मॅडमने कविवर्य कुसुमाग्रज यांचा परिचय व मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगितले तर या गौरव दिनानिमित्त शाळेतील मुलांनी मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांना स्पर्श करणा-या आपल्या कला सादर केल्या. या मध्ये अभंग, बालगीत, नाट्यछटा,पोवाडा,बहिणाबाईंच्या कविता,कुसुमाग्रजांच्या कविता, कथा कथन, समूहगीत,मराठी भाषा अभिमान गीत आदी प्रकार सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. या वेळी उरण कोमसापचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी आपल्या बालकविता सादर करून मुलांचे मनोरंजन केले.
मराठी भाषा ही आपल्या आईची भाषा आहे,आपल्या गावाची भाषा आहे.ती आपली अस्मिता आहे,तीचा गोडवा टिकवण्यासाठी मराठी भाषेतील कथा, कविता,नाट्यछटा मुलांनी वाचायला हव्या असे अवाहन देखील केले.इंग्रजी माध्यमाची शाळा असून देखील मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केल्या बद्दल आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्याचे मच्छिंद्र म्हात्रे यांनी कौतुक देखील केले. या वेळेस मराठी भाषेचे वाचन व्हावे म्हणून जागर तंबाखूमूक्तीचा आणि रोज भेटावी रम्य सकाळ ही पुरवणी काव्य संग्रहाची भेट सुध्दा शाळेस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषेचा गोडवा वाढवणारी उदाहरणे देऊन व काव्यपंक्ती वापरून सुरेख पणे मोहीनी पाटील यांनी केले.आभार प्रदर्शनाचे काम मीनाक्षी पोखरकर यांनी केले.