प्रजापती म्यॅग्नम महिला समूहातर्फे पारंपरिक मंगळागौर उत्साहात
उरण दि ३१ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदू संस्कृतीतील पारंपरिक मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते. उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहतीमध्ये मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
अलीकडे वाढत चाललेले महिला अत्याचार, बलात्कार यावरून धार्मिकता आणि हिंदू संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे काळाला अनुसरून संस्कार आणि संस्कृती जतन करणे आवश्यक आहे. या उद्देशाने मंगळागौरचे आयोजन प्रजापती म्यॅगन इमारतीमध्ये करण्यात आले. गौरीच्या रूपात पेहराव, साज श्रुगार करून गौरीचे पूजा समूह नृत्य, झिम्मा, विविध फुगडी प्रकार , पिंगा, सासू सुनेचे भांडण, नाच ग घुमा, घागर घुमू दे, या पारंपरिक नृत्याने वसाहत दुमदूमली होती.
मंगळागौर सणामुळे मैत्रीचे स्नेहधागे बांधून एक संस्कृतीचा वसा पुढच्या पिढीला सादर केला गेला . यावेळी या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.सहभोजनाचा आस्वाद घेत मंगळागौर कार्यक्रमाच्या रूपरेषेची सांगता झाली. अशा प्रकारे प्रजापती म्यॅग्नम महिला समूह आयोजित मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.