- रायगड जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाअंतर्गत प्रिझम संस्थेच्या कलाकारांचा उपक्रम
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हा प्रशासन रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड -अलिबाग उज्ज्वला बानखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी अधिकारी उरण ऋतुजा नारनवर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन २०२३-२४ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पथनाट्य कार्यक्रमाद्वारे रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्याचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता “पोषण तृणधान्याचा आहार हाच निरोगी जीवनाचा आधार” या पथनाट्यातून उरण बस स्थानक, नागाव, चिरनेर या ठिकाणी जनजागृती करण्यात आली यावेळी या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व पथनाट्यातील कलाकार नेहा पाटील, सई नाईक, सार्थक गायकवाड, अश्विनी पारधी, नेहा जावसेन, स्नेहा मानकर, दर्श नागोठकर, कविता हिंदोळे व बहुसंख्येने प्रवासी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या पथनाट्यातून पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व आणि फायदे सांगण्यात आले.
नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते, हे मधुमेह रुग्णांकरिता लाभदायक आहे, स्थूलता व संधिवात यावर परिणामकारक आहे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता कृषी विभागाच्या सहकाऱ्यांनी व श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण च्या संगीता ढेरे यांनी परिश्रम घेतले.