रत्नागिरी- वेर्णा रेल्वे विद्युतीकरणाचे २२ व २४ मार्चला सीआरएस इन्स्पेक्शन
CRS तपासणीनंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग विद्युत इंजिनसह गाड्या धावण्यासाठी होणार सज्ज!!
रत्नागिरी : रत्नागिरी ते वेर्णा या विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वे मार्गांवरील अंतिम टप्प्यातील मार्गाची सीआरएस तपासणी दि. २२ व २४ मार्च रोजी करण्यात येणार आहे. गेली सहा सात वर्षे कोकण रेल्वेचे विद्युती करणाचे काम सुरु होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून कोकण रेल्वेचे प्रदूषमुक्त रेल्वे प्रवासाचे पर्व सुरु होणार आहे.
गेल्याच महिन्यात मडगांव ते कारवार आणि मडगांव ते थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपसणी केली होती. त्या आधी कारवार ते ठोकूर तसेच रोहा ते रत्नागिरी विद्युतीकरण टप्पे पूर्ण होऊन सीआरएस निरीक्षण देखील पूर्ण झाले आहे. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्याने सध्या डाऊन दिशेला रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह चालवली जात आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गापैकी रत्नागिरी ते वेर्णा या अंतिम टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाल्याने या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून २२ व २४ रोजी तपासणी केली जाणार आहे.
यासाठी सात कोचसह सीआरएस स्पेशल ट्रेन २१ मार्च रोजी रात्री ११ वाजता सी एस टी हून कोकण रेल्वे मार्गांवर येण्यासाठी रवाना होईल. मध्य सर्कलचे सी आर एस मनोज अरोरा यांना घेऊन येणारी ही खास निरीक्षण ट्रेन दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता विद्युतीकरण तपासणी करण्यासाठी रत्नागिरी स्थानकावर दाखल होणार आहे.
दि. 22 व 24असे दोन दिवस रत्नागिरी ते वेर्णा (गोवा) दरम्यान रेल्वे सुरक्षा आयुक्त निरीक्षण करतील.
दि. २४ रोजी रात्रीरत्नागिरी स्थानकावरून CRS ट्रेन सोलापूरमधील CRS इन्स्पेक्शनसाठी रवाना होणार आहे.
दरम्यान, अंतिम टप्प्यातील CRS इन्स्पेक्शननंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग हा डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर गाड्या धावण्यासाठी सज्ज होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार सी आर एस तपासणी पूर्ण झाल्यावर इलेक्ट्रिक लोकोची उपलब्धता TSS (ट्रॅक्शन सब स्टेशन)ची उर्वरित कामे पूर्ण होईपर्यंत कोकण रेल्वे मार्गे टप्याटप्याने गाड्या इलेक्ट्रिक इंजिन सह चालवल्या जाणार आहेत. आधी दीर्घ पल्ल्याच्या गाड्या विद्युत इंजिनद्वारे चालवल्या जातील व त्या पाठोपाठ इतर गाड्या देखील विजेवर धावू लागतील. गाड्या डिझेल ऐवजी विजेवर धा ल्यामुळे वर्षाकाठी डिझेलवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार असून धुरामुळे होणारे प्रदूषण सुद्धा टाळता येणे रेल्वेला शक्य होणार आहे.
दरम्यान, दि. २८ फेब्रुवारी पासून रत्नागिरी ते थिवी दरम्यानच्या रेल्वे मार्गांवरील विद्युत वाहिनीत वीज प्रवाह सोडून चार्ज करण्यात आली आहे.