https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गाव विकास समितीकडून संगमेश्वर-चिपळूण व रत्नागिरी विधानसभा लढण्याबाबत चाचपणी

0 106
  • कोअर कमिटीच्या बैठकीत गावांच्या विकासाचा मुद्दा बुलंद करण्याचा निर्धार

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने झालेले दुर्लक्ष आणि कोकणातून मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर, बेरोजगारी, शिक्षण-आरोग्याच्या समस्या व रखडलेला गावांचा विकास या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने निवडणुका लढवाव्यात याबाबत गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या माध्यमातून चाचपणी करण्यात येत असून तशी चर्चा नुकत्याच पार पडलेल्या कोर कमिटी बैठकीत झाल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांनी दिली.

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच कोअर कमिटीची बैठक अध्यक्ष उदय गोताड यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेने सर्वसामान्य नागरिकांची संघटना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील शक्य असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करावेत असा आग्रह संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धरला. कोकणात विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या जात नाहीत.येथील निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जाव्यात. ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रस्थानी असावा या दृष्टिकोनातून भूमिका घेणे गरजेचे आहे. मागील काही वर्षात कोकणच्या विकासाकडे प्रस्थापित व्यवस्थेने पूर्णतः दुर्लक्ष केले असून येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य जनतेलाच पुढाकार घ्यावा लागेल.सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि अनेक वर्षे प्रलंबित असणारे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून गाव विकास समितीने निवडणुका लढाव्यात असे मत या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना व संघटनेने केलेल्या चर्चेवर विचार केला जाईल असे यावेळी अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सांगितले. गाव विकास समितीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना मागील 10 वर्षात आक्रमकपणे वाचा फोडली असून आता हेच प्रश्न जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याची वेळ आली असल्याचे मत या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

” गाव विकास समितीने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना मागील दहा वर्षात वाचा फोडली आहे.आता हे प्रश्न लोकांपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे गाव विकास समितीने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार द्यावेत अशी विनंती आम्ही संघटनेच्या नेतृत्वाकडे केली आहे.”

– डॉ. मंगेश कांगणे, सरचिटणीस
गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा.

संघटनेची भूमिका जोपर्यंत लोकांपर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत लोकांना या प्रश्नांची तीव्रतेने जाणीव होणार नाही. लोकांना जागृत करणे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याची संघटना म्हणून काम केलं पाहिजे या विषयावर या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले. कोकणच्या हितासाठी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार दिले पाहिजेत अशी एकमुखी मागणी या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वाकडे केली.

या कोर कमिटी बैठकीला संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष व कृषी तज्ञ राहुल यादव, सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे, सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले, जिल्हा संघटक मनोज घुग,रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुजम्मिल काझी, उपाध्यक्ष मंगेश धावडे, वांजोळे-साखरपा विभाग अध्यक्ष नितीन गोताड,महिला संघटना अध्यक्ष दीक्षा खंडागळे-गीते, महिला सदस्या ईश्वरी यादव – सुर्वे, कायदेविषयक सल्लागार सुनिल खंडागळे, महेंद्र घुग सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.