- ओरोस येथे झालेल्या विभागीय योगासन स्पर्धेत जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांची बाजी
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे झालेल्या विभागीय शालेय योगासन स्पर्धेत यश मिळवत रत्नागिरीतील सौम्या मुकादम आणि आर्य हरचकर या दोघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. हे दोघेही रत्नागिरीतील ‘जीजीपीएस’चे विद्यार्थी आहेत.
ओरोस येथे ७ व ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धा १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा ३ वयोगटात खेळविण्यात आल्या. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्य दिनेश हरचकर याने वैयक्तिक योगासन या प्रकारात तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सौम्या देवदत्त मुकादम हिने बाजी मारली. या दोघांचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवून या दोघांनी विभागीय फेरी गाठली होती. विभागीय स्तरावर सहा जिल्हे आणि दोन महानगर पालिका क्षेत्रातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यात रत्नागिरीतील जीजीपीएसच्या या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांना प्रशालेतील योग शिक्षिका सौ.श्रद्धा जोशी व दुर्वांकुर चाळके यांनी मार्गदर्शन केले होते.