राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चिपळूणची सुकन्या स्नेहा रहाटे हिचे यश
चिपळूण : स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व कर्नाटक राज्य जलतरण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धा दि २४ ते २६ नोव्हेंबर २०२३ रोजी इम्मीकिरि स्विमिंग पूल मंगळूरू (कर्नाटक) येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी २२ राज्यांमधून ८५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत चिपळूणची सुकन्या स्नेहा सदाशिव रहाटे ही देखील सहभागी झाली होती. तिने उत्कृष्ट कामगिरी नोंदवून रत्नागिरी जिल्ह्याचे वर्चस्व कायम राखले आहे.
स्नेहाने २५-२९ वर्षे वयोगटात महिलांमध्ये फ्री स्टाईल प्रकारात ५० मी वेळ 38.68 से ,१०० मी वेळ 1.30से, २०० मी वेळ 3.18 से,४०० मी वेळ 7: 08 से वेळ नोंदवून हिने 1 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य पदक प्राप्त करीत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा होता. ती सध्या चिपळूण रामतीर्थ जलतरण तलाव व एस. व्ही. जे. सी. टी क्रीडा संकुल येथे गेले ७ महिने प्रशिक्षक विनायक पवार यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतील स्नेहाच्या यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तिला एस. व्ही. जे. सी. टी क्रीडा संकुल डेरवणचे संचालक श्री. श्रीकांत पराडकर प्रशिक्षक व राष्ट्रीय कोच विनायक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.