विवाह समारंभासाठी आलेल्या एक हजार पाहुण्यांना दिली चक्क पुस्तकांची भेट!
- उद्योजक वाल्मीक चव्हाण यांचा उपक्रम
- लेखक संदीप वाकचौरे यांचे पुस्तक
- चपराक प्रकाशन पुणेची पुस्तक निर्मिती
संगमनेर दि. १६ : विवाह म्हटला की, साहजिकच मानपानाचा विषय पुढे येतो. सध्याच्या काळात काही घेतले तर द्यायचे काय ? असा मोठा प्रश्न वधू आणि वर पित्याला सतावत असतो. यावर संगमनेर येथील उद्योजक वाल्मीक चव्हाण यांनी एक नामी उपाय शोधून काढला. वाचन संस्कृती अधिकाधिक बहरावी म्हणून उद्योजक चव्हाण यांनी लग्न समारंभासाठी आलेल्या १००० हून अधिक पाहुण्यांना संगमनेर येथील लेखक संदीप वाकचौरे यांनी लिहिलेले आणि चपराक प्रकाशन पुणेचे संपादक घन: श्याम पाटील यांनी प्रकाशित केलेले शोध शिक्षणाचा या पुस्तकाच्या एक हजार प्रतींचे आलेल्या सर्व पाहुण्यांना वाटप केले. संपूर्ण संगमनेर शहरात आज दिवसभर या आगळ्यावेगळ्या पुस्तक भेट उपक्रमाची चर्चा सुरू होती.
लग्नसमारंभातून वाचन संस्कृतीला पाठबळ मिळावे यासाठी प्रयत्न करणार्या विनोद जाधव यांचे मामा, सुप्रसिद्ध उद्योजक वाल्मीक चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन! संगमनेर येथून लग्न समारंभाच्या माध्यमातून विचार पेरण्याची सुरू झालेली ही आदर्श परंपरा सर्वत्र रूजो, अशी अपेक्षा
‘चपराक प्रकाशन’,पुणेचे संपादक घनश्याम पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अकोले तालुक्यातील विनोद विठ्ठल जाधव आणि संगमनेर येथील ऐश्वर्या बाळासाहेब म्हस्के यांचा शुभविवाह आज संगमनेर येथे पार पडला. या विवाहासाठी आलेल्या एक हजारहून अधिक पाहुण्यांना शॉल, टोपी, टॉवेल असं काही न देता संदीप वाकचौरे यांनी लिहिलेल्या आणि ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘शोध शिक्षणाचा’ या पुस्तकाच्या प्रती स्नेहभेट म्हणून देण्यात आल्या. जे. कृष्णमूर्ती यांचा शिक्षणविचार या पुस्तकात प्रभावीपणे मांडला आहे.
संगमनेर येथील प्रथितयश लेखक संदीप वाकचौरे यांची चपराक प्रकाशन पुणेने आजवर शिक्षण विषयक अनेक पुस्तके प्रकाशित केली. आयुष्यात माणसाला चांगले विचार आणि शिक्षणच पुढे घेऊन जाऊ शकते. यासाठी भाच्याच्या विवाहामध्ये येणाऱ्या १००० पाहुण्यांना संदीप वाकचौरे यांनी नव्याने मुद्दामहून लिहिलेले जे कृष्णमूर्ती यांचे विचार असलेले ‘ शोध शिक्षणाचा ’ हे पुस्तक देण्याचे आम्ही ठरविले. यासाठी चपराक प्रकाशन पुणे ते संपादक घनश्याम पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे उद्योजक वाल्मीक चव्हाण यांनी सांगितले.