श्री देव आदित्य नारायण देवस्थान आरवलीच्या १४८ व्या वर्धापन दिन महोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न
आरवली : श्री देव आदित्य नारायण देवस्थान आरवलीच्या १४८ व्या वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने वैशाख शुद्ध पंचमी षष्ठी आणि सप्तमी या तीन दिवसात अनेक कार्यक्रम संपन्न झाले. नियमित कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये यावर्षी एक थोडा बदल करुन स्वर्गीय संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कै.रामभाऊ यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार श्रींच्या चरणी सेवा म्हणून सर्व मराठे कुटुंबियांच्या उपस्थितीत ‘संगीत भूषण एक स्मरण ‘असा कार्यक्रम उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी निश्चित झाला होता परंतु मराठे कुटुंबीयांच्या काही कौटुंबिक अडचणींमुळे अगदी आयत्या वेळी हा नियोजित कार्यक्रम होईल की नाही अशी साशंकता झाली होती.
पण पं. रामभाऊ मराठे यांचे आरवलीतील पाटणकर कुटुंबीयांचे जावई म्हणून आणि रामभाऊ यांचे दोन बंधू कै. केशव गजानन मराठे आणि कै.रघुनाथ गजानन मराठे यांचे आरवलीमधील वास्तव्य या दोन्ही मुळे गावाशी असणारे एक वेगळे नाते असण्याच्या पार्श्वभूमीवर ‘ संगीत भूषण एक स्मरण ‘ हा कार्यक्रम रामभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने व्हायलाच पाहिजे अशा कार्यकारी मंडळ आणि अनेक ग्रामस्थांच्या आग्रही भूमिकेमुळे अगदी मोजक्या आठ-दहा दिवसाच्या पूर्वतयारीवर हा कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला.
कै.रामभाऊ यांनी आपल्या अभिनय गाण्याने अजरामर करून ठेवलेल्या संगीत मंदार माला आणि संगीत जय जय गौरीशंकर या दोन नाटकांमध्ये सलग दोन वर्ष गायनाचे रौप्य पदक मिळवणारा चिपळूण मधील युवा गायक विशारद गुरव आणि सावर्डे येथील उदयोन्मुख युवा गायिका सृष्टी तांबे यांच्या बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
‘नट केदार ‘ या जोड रागाने विशारदने या मैफिलीची सुरुवात केली व त्यानंतर अनुक्रमे निराकार ओंकार ,रवी मी, कोण असशी तू नकळे मजला, बसंत की बहार आयी अशा रामभाऊंच्या अजरामर नाट्यपदांनी मैफिल सजवली! रामभाऊंनी संगीत दिलेल्या संगीत नाटकांमधील अनुक्रमे ऋतुराज आज वनी आला,सोहम हर डमरू बाजे आणि ये मौसम है रंगीन अशी नाट्यपदे सृष्टी तांबे हिने अल्प कालावधीत उत्तम मेहनत घेऊन नेटकी सादर केली.
मैफिलीच्या उत्तरार्धात संगीत क्षेत्रात संगीत रसिकांमध्ये आपल्या उत्तम कामगिरीने आरवली गावाचा ठसा उमटवणारे आणि आपली प्रसिध्दी लोकप्रियता या पलीकडे जाऊन आरवलीच्या आदित्य नारायणाच्या उत्सवात अत्यंत श्रद्धेने सेवाभावाने सगळ्याच प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये नम्रपणे सहभागी असणारे गायक अजिंक्य पोंक्षे, प्रथमेश लघाटे आणि सौ मुग्धा वैशंपायन लघाटे यांनीही विविध कार्यक्रमासाठी रामभाऊंची गाणी तयार करत असतानाच्या आठवणी अनुभव सांगत अनुक्रमे अजिंक्य ने जय शंकरा,मुग्धाने अंग अंग तव अनंग आणि प्रथमेशने पंडित रामभाऊंची अभोगी रागातील बंदिश देव देव महादेव आणि त्याच रागावर आधारित नाट्यपद धनसंपदा न लगे मला ही अशी नाट्य पदे स्वर्गीय रामभाऊ मराठे यांच्या आठवणीत सादर केली.
रामभाऊंच्या आरवलीतील सहवासाच्या आठवणींचा उजाळा कु.समृध्दी संतोष रानडे हिने सूत्रसंचालन,पत्र वाचन,काही किस्से यांच्या माध्यमातून घेतला.
मागील सलग दोन वर्ष राज्य नाट्य संगीत नाट्य स्पर्धेत ऑर्गन वादनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारा चिपळूण मधील युवा कलाकार हर्षल प्रसाद काटदरे याने या मैफिलीसाठी ऑर्गनची साथ संगत केली तर पं.अजितकुमार कडकडे आणि अनेक दिग्गजांना नेहमी साथसंगत करणारा विरार येथील श्री.रुपक वझे याने या कार्यक्रमासाठी तबल्याची साथ केली.
कै.रामभाऊंच्या आठवणीत झालेल्या या कार्यक्रमात रंगमंचावर लावण्यात आलेल्या फलकावरील श्री.रवींद्र खरे यांनी केलेले कै.रामभाऊंचे डिजिटल स्केच रसिक श्रोत्यांना विशेष भावले.
प्रचंड गरमा उन्हाळा आणि मध्यरात्री ०१.३० वाजताची वेळ असूनही जवळपास दोन तास २५० रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्मरण मैफलीची सांगता उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या लळीताच्या कीर्तनाच्या आधीचा कार्यक्रम म्हणून भैरवीने न होता कै.रामभाऊंच्याच सप्त सुर झंकारित बोले या लोकप्रिय नांदीच्या सामूहिक सादरीकरणाने झाली.