कोण म्हणतं महागडी? आरक्षण खुले होताच गणेशोत्सवातील वंदे भारत एक्सप्रेस भरली सुद्धा !
उद्घाटन होण्याच्या आधीच गणेशोत्सवातील वंदे भारत एक्सप्रेस हाउसफुल्ल!
रत्नागिरी : संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाने युक्त वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरांबद्दल ती महागडी असल्याबाबत एकीकडे चर्चा केली जात असताना प्रत्यक्षात कोकण रेल्वे मार्गावर उद्घाटन होण्याआधीच आरक्षण खुले झाल्यानंतर गणेशोत्सवातील चार दिवसांचे बुकिंग हाऊसफुल्ल देखील झाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ मंगळवार दिनांक 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. मुंबईतील सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या 28 जूनपासून सुरू होत आहेत. यासाठीचे आरक्षण सोमवार दिनांक 27 जून रोजी सकाळी खुले झाल्यानंतर गणेशोत्सव कालावधीतील चार दिवसांची वंदे भारत एक्सप्रेस भरून देखील गेली आहे. या चारही दिवसांचे कन्फर्म आरक्षण मिळणे बंद झाल्याने प्रवाशांना आता प्रतीक्षा यादीवरील तिकीटे घ्यावी लागत आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसच्या सोमवारी दुपारपर्यंतच्या आरक्षण स्थितीनुसार गणेशोत्सवातील 15 तसेच 18 सप्टेंबर या तारखांची मुंबई ते मडगाव दरम्यानच्या फेरीसाठी सर्व तिकिटे बुक झाले आहेत. त्याचबरोबर गणेश विसर्जन उरकून परतणाऱ्यांच्या गर्दीमुळे दिनांक 23 तसेच 25 सप्टेंबर 2023 रोजीची मडगाव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. या दिवसांसाठी आता प्रतीक्षा यादीवरील तिकिटे विकली जात आहेत.
काही दिवसापूर्वीच वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर हे सामान्यांच्या आवाक्यातले नसून ती कुणाला परवडणार, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, प्रत्यक्षात अशी चर्चा करणाऱ्यांच्या नुसार महागड्या म्हणून चर्चा झालेल्या वंदे भरत एक्सप्रेसची कन्फर्म तिकीट देखील मिळणे मुश्किल झाले आहे.