चिपळूण : गेले तीन महिने चिपळूण परिसरातील ग्रामीण भागातील सहा शाळांमधे छोटे कलाकार हा अत्यंत वेगळा व अभिनव उपक्रम ज्ञानप्रबोधिनी च्या चिपळूण संपर्क केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आला.
संगीत शिकवण्यापेक्षा संगीत विषयी आवड निर्माण करणे, अभिजात भारतीय शास्त्रीय,उपशास्त्रीय आणि लोकसंगीत का ऐकायचे ?कसे समजून घ्यायचे? त्यातून आनंद कसा मिळवायचा? अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शालेय वयापासून मुलांना त्यांच्याच शाळेत संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तबला – पखवाज, संवादिनी,शास्त्रीय व सुगम गायन, लोकसंगीतामधील तालवाद्य आणि नारदीय किर्तन अशा कला प्रकारांची प्रत्येकी एक अशी एकूण पाच सत्र पोफळी, अलोरे, आंबडस, मिरजोळी,रामपूर आणि माखजन या शाळांमध्ये घेण्यात आली.
संकेत नवरत, मानस साखरपेकर,सायली मुळ्ये,अक्षदा सकपाळ, मिलिंद लिंगायत आणि विशारद गुरव या कलाकार युवकांनी मुलांचे दादा ताई होऊन आपल्या आपल्या संगीत क्षेत्रातील व्यस्तता सांभाळून सामाजिक जाणिवेतून विना मोबदला ही सत्र घेतली.सर्व शाळांमध्ये मिळून जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला यापैकी निवडक ६० मुलांसाठी एक दिवसीय संगीत कार्यशाळा आणि समारोप कार्यक्रम बुधवार २० एप्रिल रोजी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कला दालनात संपन्न झाला.
शास्त्रीय संगीत संबंधी स्वर,ताल,लय,राग आणि रियाज अशा पायाभूत संकल्पनांची खेळत खेळत परिचय करुन देणाऱ्या तीन तासांची कार्यशाळा,अभिजात संगीत संबंधी माहितीपट,गमतीदार वादविवाद स्पर्धा अशा उत्तरोत्तर रंगत गेलेल्या सकाळ सत्रात रममाण झालेल्या मुलांना दुपारच्या सत्रात झी युवा युवा सिंगर एक नंबर या स्पर्धेतील उपविजेत्या दर्शन-दुर्वांकुर या जोडी पैकी दर्शन कुलकर्णी या युवा गायकाशी झालेल्या गप्पांमधून संगीत क्षेत्राकडे पहायचा नवा दृष्टिकोन मिळाला.
सकाळच्या सत्रात कार्यशाळेमधून अगदी मोजक्या वेळेत तयार करुन घेतलेली ए वतन आबाद रहे तू आणि हम भारत के सैनिक ही दोन समूहगीते सहभागी मुलांनी उत्तम प्रकारे सादर केली.
राज्य संगीत नाट्य स्पर्धा गाजवणाऱ्या सायली मुळ्ये,विशारद गुरव यांच्या सोबत अक्षदा सकपाळ यांनी सादर केलेला नवरसांवर आधारित संगीत नाटकांमधील प्रवेश आणि त्यानंतर संकेत नवरत,मानस साखरपेकर,सूरज पाटणकर आणि मिलिंद लिंगायत या सर्व मार्गदर्शक दादांनी सादर केलेलं पखवाज,तबला ढोलकी संवादिनी अशा वाद्यांच एकत्रीत सादरीकरण मुलांना शब्दातीत अनुभव देऊन गेलं आणि त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरलं त्यांच्यात कुतूहल निर्माण करुन गेलं.
कार्यशाळा,मुलाखत,माहितीपट, सादरीकरणे अशा दिवसभर भरगच्च सांगीतिक कार्यक्रमातही मुलं छान रमतात त्याचा आनंद घेतात हा अनुभव समाधान देणारा होता.
चिपळूण संपर्क केंद्र आयोजित या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी पुणे प्रशालेच्या मुक्ती सोपान संगीत विभाग प्रमुख शीतलताई कापशिकर, कोकण प्रतोद आदित्यदादा शिंदे आणि दर्शन कुलकर्णी यांनी एकंदर दिवसभराच्या पूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाचे आपल्या मनोगतात विशेष कौतुक केले.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |